लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा: जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या मलकापूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील तिहेरी हत्याकांडातील दोघा बहीणांचा कुऱ्हाडीचे वार करून एकाच ठिकाणी खून करण्यात आला असल्याची माहिती बोराखेडी पोलिसांच्या तपासात समोर येत आहे.बोराखेडी पोलिसांनी १५ आँक्टोबर रोजी आईसह तिच्या दोन मुलींची निर्घुणपणे हत्या झाल्याचे प्रकरण उघड केले होते. या प्रकरणात गावातीलच आरोपी दादाराव अंबादास म्हैसागर (३८) यास अटक केली होती. त्यास न्यायालयाने २० आँक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. अनैतिक संबंधातून हे तिहेरी हत्याकांड झाल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे. मात्र तुर्तास त्यातील बारकावे तपासाच्या दृष्टीने तथा न्यायालयाद दोषारोपत्र दाखल करण्याच्या दृष्टीने योग्य ठरणार नाही, असे ठाणेदार माधवराव गरुड यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. दरम्यान, राधा मालठाणे व शारदा मालठाणे या दोघा बहिणींचा खूनही आरोपीने कुऱ्हाडीचे वार करून केल्याचे तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे ज्या पडक्या विहीरीत या दोघींचे मृतदहे टाकण्यात आले होते. त्याच्या जवळच आरोपी दादाराव म्हैसागर आणि राधा व शारदा यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर आपसी वाद होवून दोघींचा आरोपीने खून केल्याचे पोलिस सुत्रांचे म्हणणे आहे.तर सुमनबाई मालठाणे यांचा गऱ्हाड नाल्यात खून करण्यात आला असल्याचे समोर येत आहे. प्राथमिकस्तरावर अनैतिक संबंधातून झालेल्या वादातूनच हे तिहेरी हत्याकांड झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
वैद्यकीय व तांत्रिक पुरावे गोळा करण्यावर भरया प्रकरणाची क्लिष्ठता पाहता वैद्यकीय व तांत्रिक पुरावे गोळा करण्यावर पोलिसांचा भर असून सायबर सेलचीही या प्रकरणात मदत घेण्यात येत आहे. प्रकरणाच्या पुढीलत तपासाच्या दृष्टीने तुर्तास काही बाबी उजागर करणे योग्य ठरणार नाही, असे ठाणेदार माधवराव गरुड म्हणाले. सोबतच आरोपीचीही कसून चौकशी करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.