मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. उज्जैनमधील एका कुटुंबाने विष घेतल्याचा भयंकर व्हिडीओ आता समोर आला आहे. मुंबईतील एक अभिनेत्री आपल्याला त्रास देत असल्याच सांगत दोन महिला आणि एका पुरुषाने विष घेतलं. तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे तरुणीदेखील समोर आली आहे. तिने आपलं शोषण झाल्याचा आरोप केला आहे. तसेच आपण पाच महिन्यांची गर्भवती असल्याचा दावाही केला.
मिळालेल्या माहितीनुसार, उज्जैनमध्ये वास्तव्यास असलेल्या आशी खान यांचा व्हिडीओ समोर आला आहे. आशी खान यांच्यासोबत त्यांची आई परवीन आणि पत्नी इशा खान यांनीदेखील विष घेतलं. मुंबईत राहणारी, स्वत:ला अभिनेत्री म्हणवणारी तरुणी सातत्याने त्रास देत असल्याचं तिघांनी सांगितलं. अभिनेत्रीने आधी मुंबई आणि त्यानंतर उज्जैनच्या महाकाल पोलीस ठाण्यात आशी खानविरोधात कलम 376 च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. दोन्हीवेळा अभिनेत्रीने जामिनाच्या नावाखाली लाखो रुपये वसूल केल्याचा आरोप खान कुटुंबाने केला आहे.
"अभिनेत्रीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून विष घेतलं"
अभिनेत्रीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून विष घेत असल्याचं कुटुंबानं सांगितलं. विष घेणाऱ्या तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोप केल्यानंतर संबंधित तरुणीदेखील पुढे आली आहे. आशी खान आणि त्याचे कुटुंबीय माझ्यावर खोटा आरोप करत आहेत. ते मला मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं तिनं म्हटलं. मुंबई आणि उज्जैन दोन्ही प्रकरणांमध्ये आशी खानचा जामीन मीच केला. कारण मी आशीवर खूप प्रेम करते. मी त्याच्या मुलाची आई होणार आहे. आशी आधीपासूनच विवाहित असल्याचं मला माहीत नव्हतं. मला तर केवळ त्याच्यासोबत राहायचं आहे. मात्र जामीन झाल्यावर त्यानं शब्द फिरवला.
"मला खोटं ठरवण्यासाठी विष घेतल्याचं नाटक"
मला खोटं ठरवण्यासाठी विष घेतल्याचं नाटक करत आहे, असं तरुणीनं म्हटलं. आशी खान मुंबईतील ओशिवरामध्ये कपड्यांचा व्यवसाय करतो. आरोप करणाऱ्या तरुणीसोबत तो दोन वर्षे लिव्ह इनमध्ये होता. तरुणी गुवाहाटाची रहिवासी आहे. लग्नास नकार दिल्यानंतर प्रकरण समोर आलं. त्यानंतर एप्रिल 2022 मध्ये तरुणीनं आशीविरोधात मुंबईत बलात्काराची तक्रार नोंदवली. त्यानंतर प्रकरण न्यायालयात गेलं. न्यायमूर्तींनी आशीची रवानगी कोठडीत केली. त्यानंतर आशीला जामीन मिळाला. मग तो उज्जैनला गेला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"