मुंबई : टीआरपी घोटाळ्याप्रकरणी उत्तर प्रदेश येथून अटक केलेल्या विनय त्रिपाठीला (२९) मंगळवारी १६ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अन्य आरोपींसोबत त्याची समोरासमोर चौकशी करण्यात येईल.
आरोपींच्या समोरासमोर चौकशीसाठी त्रिपाठीच्या कोठडीची न्यायालयात मागणी करण्यात आली. अटक आरोपी विशाल भंडारीच्या डायरीत सापडलेल्या नोंदीबाबत त्याच्याकडे चौकशी करणे गरजेचे असल्याचेही पथकाने सांगितले. त्यानुसार, स्थानिक न्यायालयाने त्याला १६ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्रिपाठीने कुणाकड़ून किती पैसे घेतले? कुठल्या टीव्ही चॅनेल्सचा यात समावेश आहे? आदींबाबत गुन्हे गुप्तवार्ता विभाग त्याच्याकडे कसून चौकशी करत आहे. त्रिपाठी हा बदलापूर पश्चिमेकडील बहरीज रोड येथील विशाल ज्योती को.ऑप. हौसिंग सोसायटी येथे राहण्यास आहे.
अटक केलेला हंसा कंपनीचा विशाल वेद भंडारी (२१), अंधेरीतील बोमपेली नारायण मिस्त्री (४४), बॉक्स सिनेमाचे नारायण नंदकिशोर शर्मा (४७) आणि फक्त मराठीचे शिरीष सतीश पत्तनशेट्टी (४४) यांची कोठडी बुधवारी संपत असल्याने, त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल. दिनेश विश्वकर्मा, रॉकीसह अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.