नागपूर : भिवंडी येथून ओडिशाला पाठविण्यात आलेले ४९ लाखांचे एसी ट्रकचालक आणि क्लिनरने परस्पर विकून टाकले. ही बाब लक्षात आल्यानंतर भिवंडीच्या ट्रांसपोर्टरने नागपुरात येऊन पोलिसांकडे तक्रार नोंदवली. अक्रम मुस्ताक अहमद शेख (वय ३९) हे कल्याण (ठाणे) येथील रहिवासी असून ते भिवंडी येथून ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतात.
त्यांनी २९ मार्चला आरोपी ट्रक चालक इरफान अतहर आणि क्लीनर वासिफ यांच्याकडे एमएच ०५/ एएम २४३३ मध्ये ४० लाख, १८ हजार रुपये किमतीचे १४० एसी ओडिशा येथे पोहचण्यासाठी दिले. आरोपी इरफान आणि वासीफ यांनी संगनमत करून भिवंडी ते नागपूर दरम्यान सर्वच्या सर्व एसी परस्पर विकून टाकले. रिकामा कंटेनर कापसी येथील उमिया इंडस्ट्रीज समोर उभा केला आणि पळून गेले. ३१ मार्चला ट्रान्सपोर्टर अक्रम यांनी आरोपी ट्रक चालक व वाहकासोबत संपर्क केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. ट्रकचे लोकेशन नागपुरात दिसत असल्याने ते ४ एप्रिलला नागपुरात पोहोचले. त्यांनी पारडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपी इरफान तसेच वासिफ या दोघांविरुद्ध विश्वासघाताचा गुन्हा नोंदवला. त्यांचा शोध घेतला जात आहे.