पुणे : औंध येथील ‘पीएनजी ब्रदर्स’ या नामांकित सराफी पेढीमधून सोने खरेदी केल्यानंतर बिलाची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत तब्बल २५ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेता मिलिंद दास्ताने व त्यांच्या पत्नीस चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अधिक तपासासाठी २१ जूनपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे़. या प्रकरणी ‘पीएनजी ब्रदर्स’च्या अक्षय श्रीकृष्ण गाडगीळ (वय ३४, रा. कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून अभिनेता मिलिंद गणेश दास्ताने आणि त्यांची पत्नी सायली मिलिंद दास्ताने उर्फ सायली बालाजी पिसे (दोघेही रा. त्रिमूर्ती सोसायटी, तळजाई पठार, धनकवडी) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. दास्ताने यांनी औंध येथील ‘पीएनजी ब्रदर्स’ सराफी पेढीमधील व्यवस्थापक दास्ताने यांच्या असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन तेथून वारंवार सोने-चांदीचे दागिने, बिस्किटे व हिरे खरेदी केले होते. त्यानंतर त्यांनी खरेदी केलेल्या दागिन्यांची काही प्रमाणात रक्कम दिली. मात्र उर्वरित रक्कम व त्यावरील व्याज देण्यास ते टाळाटाळ करत होते. डोंबिवली येथील जागा विकल्यानंतर तुमचे पैसे देतो आश्वासन त्यांनी गाडगीळ यांना दिले होते, असे फिर्यादीत नमूद आहे. चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक करुन दोघांनाही मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपींची खरेच डोंबिवली येथे जागा आहे का? फिर्यादी यांच्या दुकानातील कर्मचाऱ्यांनी त्यांना मदत केली आहे का? याचा तपास करण्यासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील चैत्राली पणशीकर यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्यांना २१ जूनपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे़
‘तुझ्यात जीव रंगला’ फेम पत्नीसह मिलिंद दास्तानेला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 8:40 PM
तब्बल २५ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेता मिलिंद दास्ताने व त्यांच्या पत्नीस चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली.
ठळक मुद्देपीएनजी ब्रदर्सची २५ लाखांची फसवणूक : २१ जूनपर्यंत पोलीस कोठडी