मुंबई : दोन महिन्यांपूर्वी पत्नीसोबत कडाक्याचे भांडण झाले. यावेळी पत्नी घर सोडून जात असताना ‘तुम नहीं आई तो मैं, किसीको नहीं छोडूगा, सबको मार डालुंगा,’ अशी धमकी त्याने दिली होती. तेच खरे ठरल्याचे या हल्ल्यात मृत्यू झालेल्या जेनील ब्रह्मभट्ट हिची लहान बहीण देवांशी हिने सांगितले. सुरुवातीला इमारत पडत असल्याने आरडाओरडा झाला, असे वाटल्याने आई आणि बहीण वरच्या मजल्यावर गेल्या. त्यानंतर मात्र त्या रक्ताने माखून परतल्याने आम्ही हादरून गेलाे.
पहिल्या मजल्यावर ब्रह्मभट्ट कुटुंबीय राहण्यास आहे. त्यातील सायन्स शाखेचा अभ्यास करत असलेल्या जेनिलचा (१८) मृत्यू झाला, तर आई स्नेहल (४६) यांची प्रकृती चिंताजनक आहे. जेनिल आई-वडील आणि दोन भावंडांसोबत राहायची. चार दिवसांपूर्वी लहान भाऊ जयदेव याचा वाढदिवस कुटुंबीयांनी मोठ्या उत्साहात साजरा केला होता. तसेच त्यांच्या घरात सत्संगदेखील होत असे. यावेळीही तो पार पडला.त्यांची लहान मुलगी देवांशीच्या माहितीनुसार, आम्ही सगळे घरात बसलो होतो. अचानक किंकाळ्या कानावर पडल्या. इमारत पडतेय या भीतीने आई-बहिणीने वरच्या मजल्यावर धाव घेतली. थोड्या वेळाने त्यांचा आवाज ऐकून मी जाणार तोच आई-बहीण रक्तबंबाळ अवस्थेत खाली आली. त्या दारातच बसल्या. कशीबशी ओढणी गुंडाळून शेजारच्यांनी त्यांना रुग्णालयात नेले.
नागरिक स्टम्प घेऊन धावले... हल्ल्यानंतर चेतन पहिल्या मजल्यावर येणार तोच तेथील काही जणांनी स्टम्प घेऊन त्याच्या दिशेने धाव घेतली. तेव्हा पळून जात त्याने घरात स्वतःला कोंडून घेतले. पोलिसांनी घर गाठल्यानंतरही तो बाहेर येत नव्हता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप खुडे यांनी बऱ्याच वेळेच्या ड्रामानंतर त्याला दरवाजा तोडण्याची धमकी देताच त्याने दरवाजा उघडला. मग, त्याला ताब्यात घेत अटक केली.
मुलगा थोडक्यात वाचला... दुसऱ्या मजल्यावर राहणारा १० वर्षांचा मुलगाही या घटनेनंतर तेथे आला. त्यालाही चेतनने पकडले. मात्र, तो जोरात रडू लागल्याने आणि नागरिकांनी आरडाओरड करताच त्याने मुलाला सोडले आणि मुलगा घरी पळाला. माझा मुलगा थोडक्यात बचावला, असे त्याचे वडील जिग्नेश शहा यांनी सांगितले.
आम्ही फक्त पळत होतो... दुपारची वेळ असल्यामुळे आम्ही झोपलेलो. अचानक किंकाळी आणि जोराचा आवाज होताच बाहेर बघितले, तर चेतन हा सपासप वार करीत होता. घाबरून आम्ही घरातच धाव घेत कोंडून घेतले. अजूनही ते आठवले, तर अंगाचा थरकाप होत असल्याचे जैन कुटुंबीयांनी सांगितले.