नालासोपारा : टीव्ही अभिनेत्री तुनीषा शर्मा आत्महत्येतील आरोपी शिजान खानचा जामीन वसई न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. तुनिषाच्या कुटुंबीयांनी शिजानच्या आईलाही या प्रकरणात आरोपी बनवण्याची मागणी पोलिस आयुक्तांकडे केल्याचे सूत्रांनी सांगितले.
जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने त्याचे वकील मंगळवारी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करणार आहेत. याशिवाय तुनीषाच्या कुटुंबीयांनी मीरा-भाईंदर, वसई-विरारचे पोलिस आयुक्त मधुकर पांडेय यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्यात शिजानच्या आईला या प्रकरणात आरोपी बनवण्याची मागणी करण्यात आल्याचे सूत्रांकडून कळते. त्याच्या आईविरोधात दिलेल्या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश आयुक्तांनी वालीव पोलिसांना दिल्याचेही सांगण्यात येते.
या कारणांमुळे फेटाळला जामीन
तुनीषा आणि शिजान रिलेशनशिपमध्ये असल्याचे वसई न्यायालयाने मान्य केले. १५ डिसेंबरला दोघांचे ब्रेकअप झाले. त्यामुळे १६ डिसेंबरला तुनीषाला पॅनिक अटॅक आला होता. २४ डिसेंबरला तुनीषाने आत्महत्या केली, तेव्हा शिजान हा तुनीषाला भेटणारी शेवटची व्यक्ती होती. सीसीटीव्ही फुटेजमध्येही या गोष्टीची पुष्टी झाली आहे. ब्रेकअपनंतर तुनीषा नैराश्यात असल्याचेही कोर्टाने मान्य केले. आत्महत्येपूर्वी तुनीषा शिजानच्या खोलीत होती. तपासाच्या या टप्प्यावर जामीन मंजूर झाल्यास प्रकरणावर परिणाम होऊ शकतो. या सर्व परिस्थितीचा तपास करणे आवश्यक असल्याने वसई न्यायालयाने शिजानचा जामीन शुक्रवारी फेटाळला आहे.