वाराणसी – कोरोना संकट काळात मुंबईहून आपल्या घरी वाराणसी परतलेल्या चंद्रकांत सिंह उर्फ मोनू याने मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कपसेठीच्या इसरवार गावातील रहिवासी चंद्रकांत सिंहने घरात पंख्याला लटकून जीव दिला आहे. या घटनेने संपूर्ण गावात खळबळ माजली आहे. सूचना मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहचले आणि मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला आहे.
पोलिसांनी रुममध्ये प्रवेश करताच त्यांना मोनूचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पाहायला मिळाला. त्यासोबतच आत्महत्येचं कारण त्याने भिंतीवर लिहिल्याचं दिसून आलं. यात शेजारी राहणाऱ्या एका कुटुंबातीलच १० नावं लिहिली होती. मुंबईमध्ये प्रोडक्शन हाऊसमध्ये मोनू सहाय्यक म्हणून काम करत होता. मोनूच्या काकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. इसरवार गावातील टेलिफोन विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी बलवंत सिंह यांच्या दोन मुलांपैकी एक मोनू मुंबईत काम करत होता. कोरोना संकटकाळामुळे मोनूला वाराणसी त्याच्या घरी परतावं लागलं.
मोनू सिंह यांच्या कुटुंबाचे आणि शेजारी राहणाऱ्या राजकुमार सिंह, सुनील कुमार यांच्या कुटुंबासोबत गेल्या अनेक वर्षापासून जमिनीवरून वाद सुरू आहेत. शेजारी राहणारे कुटुंब त्यांच्या हद्दीतील जमिनीवर घर बांधत होते आणि बाल्कनी मोनूच्या जमिनीच्या हद्दीत काढली होती. या गोष्टीचा मोनू सिंह कुटुंब विरोध करत होतं. या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी गावातील पंचायत बसवण्यात आली यात राजकुमार सिंह यांच्या कुटुंबाने धाक दाखवून मोनू सिंह याला बेदम मारहाण केली. पंचायतीसमोर मारहाण झाल्यानंतर मोनू सिंह खूप घाबरलेल्या अवस्थेत होता.
त्यानंतर मंगळवारी सकाळी मोनूचा मृतदेह त्याच्या रुममध्ये पंख्याला लटकलेला दिसून आला. इतकचं नाही तर मोनूने गळफास घेण्यापूर्वी रुमच्या भिंतीवर शेजारी राहणाऱ्या १० लोकांची नावं लिहून आत्महत्येसाठी जबाबदार धरलं आणि जमीन ताब्यात घेतल्याचं म्हटलं आहे. मोनूच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. मोनूच्या अचानक जाण्याने त्याच्या आईला मोठा धक्का बसला.