लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी मुंबई विमानतळावर असलेल्या फूड स्टॉलच्या तीन कर्मचाऱ्यांसह आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ९ कोटी ९५ लाख रुपये इतकी आहे.
परदेशातून मुंबईत येणारे प्रवासी विमानतळावरील फूड स्टॉलच्या कर्मचाऱ्यांना सोने असलेली पाकिटे देत होते. हे कर्मचारी ती पाकिटे विमानतळाबाहेर नेऊन अन्य लोकांना देत असल्याची त्यांची कार्यपद्धती होती.
आठ पाकिटांमध्ये सोन्याची पेस्ट बुधवारी हे कर्मचारी अशी आठ पाकिटे घेऊन जेव्हा विमानतळावर बाहेर गेले तेव्हा अधिकाऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर या तीन कर्मचाऱ्यांनी विमानतळाबाहेर असलेल्या अन्य तीन जणांकडे ही पाकिटे दिली.त्याचवेळी अधिकाऱ्यांनी या सहाजणांना थांबवत त्यांची चौकशी केली. त्या दरम्यान त्यांच्याकडे असलेल्या या आठ पाकिटांमध्ये साडेबारा किलो सोन्याची पेस्ट आढळून आली.दरम्यान, गेल्या दोन दिवसांत डीआरआयने एकूण ३६ किलो सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे.