धुळे : कौटुंबिक वादामुळे विभक्त राहणाऱ्या शिक्षिकेच्या मयत पतीच्या बँक खात्यातून सुमारे ११ लाख ४७ हजाराची रक्कम काढल्याचा, तसेच संसारोपयोगी साहित्य लंपास करण्याचा प्रकार धुळ्यात उघडकीस आला. याप्रकरणी भावासह चारजणांविरोधात धुळे तालुका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
साक्री तालुक्यातील फोफरे येथील मीराबाई विश्वास सूर्यवंशी (३५, ह.मु. करुणाविहार सोसायटी, साक्री रोड, धुळे) या महिलेने फिर्याद दाखल केली. त्यानुसार कौटुंबिक वादामुळे २१ मे २०२१ पासून माहेरी राहत असताना पतीने आत्महत्या केली. त्यानंतर दीर शरद किसन सूर्यवंशी (३५, रा. सुट्रेपाडा, आनंदखेडे, ता. धुळे), सुभाष सीताराम हाके (४५, रा. उडाणे, ता. धुळे), सतीश राजधर मासुळे (२२, रा. सुट्रेपाडा, ता. धुळे) आणि आनंदा शालिक पाटील (बागले) (२७, रा. वणी-अंबोडे, ता. धुळे) या संशयितांनी संगनमत केले. पतीच्या एटीएम कार्डसह मोबाइल फोनवरील फोन-पे ॲपद्वारे बँक खात्यातील ११ लाख ४७ हजार २९५ रुपये परस्पर काढून घेतले. तसेच कुसुंबा येथे राहत असताना संसारोपयोगी साहित्यासह पतीचे बँकेचे पासबुक, एटीएम कार्ड, शैक्षणिक अर्हता असलेले कागदपत्र, प्लाॅटचे मूळ कागदपत्रे , शेतीचे मूळ कागदपत्रे संमतीशिवाय चोरून नेले आहे, अशी फिर्याद धुळे तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाल्याने चारजणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. महिला पोलिस उपनिरीक्षक विजया पवार घटनेचा तपास करीत आहेत.