मुंबई - प्रसिद्ध चित्रपट निर्माती कंपनी यशराज आणि चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी कपडे भाड्याने देणाऱ्या मगनलाल ड्रेसवाला कंपनीला २ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या दुकलीला नुकतीच जुहू पोलिसांनीअटक केली. रवी दुबे आणि जितेंद्र राठोड अशी या अटक दोघांची नावे आहेत. या दोघांनी मगनलाल ड्रेसवाला कंपनीचा ईमेल हॅक करून ही चोरी केल्याची दुकलीने कबुली दिली आहे. या प्रकरणी जुहू पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ३ महिन्यांपूर्वी एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मगनलाल ड्रेसवाला कंपनीकडून यशराज कंपनीने कपडे भाड्यानं घेतले होते. या भाड्याच्या कपड्याचे १ लाख ७५ हजार रुपयांचे देयकाचे बिल ई-मेलद्वारे पाठवले होते. मात्र, पैसे मगनलाल ड्रेसवाला कंपनीच्या खात्यात जमा न झाल्याने कंपनीच्या व्यवस्थापकाने यशराज कंपनीच्या व्यवस्थापकाकडे पैशांबाबत विचारणा केली. त्यावेळी पैसे एक आठवड्यापूर्वी पाठवल्याचं यशराजकडून सांगण्यात आलं. त्याबाबतचा तपशील ही यशराज कंपनीकडून दाखवण्यात आला. पोलिसांनी केलेल्या अधिक चौकशीत मगनलाल कंपनीच्या अधिकृत ईमेल आयडीवरून हे पैसे एचएसबीसीच्या खात्यात वळवण्यात आल्याचं उघड झालं. त्यानुसार पोलिसांनी संबधित खातेदार रवी दुबे याला ताब्यात घेतलं. त्याने या गुन्ह्यात जितेंद्र राठोड या त्याच्या सहकाऱ्याचंही नाव देखील उघड केलं. या दोघांनी ईमेल आयडी हॅक करून हा गंडा घातल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.