आर्यन खान ड्रग्ज पार्टी प्रकरणात आज दोन आरोपींना जामीन मंजूर झाला आहे. विशेष NDPS कोर्टाने आज या प्रकरणात दोघांची जामिनावर सुटका केली आहे. मनिष राजघारिया आणि अविन साहू अशी या दोन सहआरोपींची नाव आहेत. या दोघांना कोर्टाने ५० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात जामीन मंजूर झालेले हे पहिलेच दोन आरोपी आहेत.
मनिष राजघारीया आणि अविन साहू हे दोघे क्रूझवरचे प्रवासी असल्याचं सांगण्यात आलं. एनसीबीने राजघारीयाकडून 2.4 ग्रॅम गांजाही जप्त केला होता. तर अविन साहूकडून काहीही जप्त करण्यात आलं नव्हतं. कोर्टाने गेल्या आठवड्यात या दोघांच्या जामिनावरचा निर्णय राखून ठेवला होता, अशी सहआरोपी मनिष राजघारियाचे वकील अजय दुबे यांनी माहिती दिली आहे.
न्या. व्ही. व्ही. पाटील मंगळवारी यावर सुनावणी घेतली. वकील अयाझ खान यांनी नुपूर सतलेजाच्या बाजूने युक्तीवाद केला होता. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्या जामीन अर्जांवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीमध्ये आर्यन खानच्या जामीन अर्जावरची सुनावणी पूर्ण झाली असून आता अरबाज मर्चंटच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे. आज हायकोर्टाने सुनावणी तहकूब करत उद्या दुपारी याप्रकरणी सुनावणी ठेवली आहे.