जोधपूर – राजस्थानच्या जोधपूरमध्ये फसवणुकीचं प्रकरण बाहेर आलं आहे. ज्याठिकाणी एका महिलेला तिच्या पतीला वाढदिवसाचं सरप्राइज देणं महागात पडलं आहे. आणि तिला लाखो रुपयांचा चुना लागला आहे. पतीच्या वाढदिवशी काहीतरी हटके आणि भन्नाट देण्याचा पत्नीचा विचार सुरु होता. मात्र त्याचवेळी ती आरोपींच्या जाळ्यात फसली आणि फसवणुकीचा बळी पडली. आता पती-पत्नी दोघं मिळून पोलीस स्टेशनमध्ये न्यायासाठी मागणी करत आहेत.
पतीच्या वाढदिवसानिमित्त पत्नी त्याला सरप्राइज म्हणून एक फ्लॅट देऊ इच्छित होती. परंतु तिची फसवणूक झाली आणि या दोन्ही दाम्पत्याने मिळून पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस अधिकारी दिनेश लखावत यांच्या माहितीनुसार, अभिषेक जैन आणि प्रियंका जैन या पती-पत्नीनं नितीन सिंह सिसोदिया, मनसुख सोनी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीत म्हटलंय की, प्रियंका तिचा पती अभिषेकला १७ डिसेंबर २०२१ रोजी बर्थ डेच्या निमित्ताने सरप्राइज देण्यासाठी प्लॅन करत होती. त्यासाठी तिने कौंटुंबिक मित्र नितीन सिंहला एक फ्लॅट पतीला गिफ्टला द्यायचा आहे असं सांगितले. त्यावर नितीन सिंहने मनसुख सोनी नावाच्या व्यक्तीसोबत प्रियंका जैनची भेट घालून दिली.
नितीन सिंह सिसोदियाने प्रियंका जैनला सांगितले की, मनसुख सोनीला पैशांची गरज आहे. जर तुम्ही त्याचा फ्लॅट खरेदी केला तर त्यात तुमचा फायदा आहे. ज्यावर प्रियंकाने पती अभिषेकला न सांगताच ५ डिसेंबर २०१९ रोजी नितीनला वकील अनिल शर्मा यांच्या समक्ष ९ लाख रुपये देत मनसुखसोबत करार केला. त्यानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये नितीन सिंहने प्रियंकाला सांगत इमारतीचं काम वेगाने सुरु आहे. लवकरच तुम्हाला फ्लॅट मिळेल पण तुम्हाला २० हजार रुपये ईमआय भरावा लागेल. त्यामुळे फायनल पेमेंटसाठी तुम्हाला आर्थिक चणचण भासणार नाही.
ऑगस्ट २०२१ पर्यंत प्रियंकाने दर महिन्याला रोख २० हजार रुपये नितीन सिंह याच्याकडे दिले. परंतु जेव्हा कागदपत्रांची मागणी केली तेव्हा तो टाळाटाळ करायला लागला. त्यानंतर भांडाफोड उघड होणार या भीतीने त्याने प्रियंकाच्या लहान मुलांचं अपहरण करण्याची धमकी देऊ लागला. तेव्हा प्रियंकाने ही गोष्ट पती अभिषेकला सांगितली. अभिषेकनं नितीन सिंह आणि मनसुख सोनीकडे कागदपत्रांची मागणी केली परंतु त्यांनी देण्यास नकार दिला. नितीन सिंह हा सरकारी विभागात काम करतो. जेव्हा फ्लॅटची माहिती घेतली तेव्हा मनसुख सोनीनं ऑगस्ट २०२० मध्ये फ्लॅटवर कर्ज घेतल्याची माहिती समोर आली. सध्या या प्रकरणात पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली आहे.