योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: दोन आठवड्यांअगोदर वाडीतील डिफेन्स क्वाॅर्टर्स परिसराजवळ चोरट्यांनी गॅस एजन्सीच्या कॅशिअरला जखमी करून १२.५७ लाखांचा ऐवज लंपास केल्यामुळे खळबळ उडाली होती. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून ९.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वाडी पोलीस ठाण्यातील पथकाने ही कारवाई केली.
अमरावती मार्गावरील डिफेन्स क्वॉर्टरजवळील तोलानी चौकात एचपी गॅस एजन्सी आहे. तेथे सिद्धार्थ रामचंद्र सुखदेवे (५९) हे मागील ४० वर्षांपासून काम करतात. ते व्यवस्थापक व कॅशिअर अशी दोन्ही कामे सांभाळतात. कंपनीचे तोलानी चौकातील यूको बँकेत खाते आहे. एजन्सीच्या वतीने आर्थिक व्यवहार सुखदेव स्वत: करतात. शनिवार व रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने एजन्सीच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात पैसे जमा झाले होते. बँकेत १२ लाख ५७ हजार रुपये जमा करण्यासाठी सुखदेव सकाळी साडेदहा वाजता दुचाकीवरून कार्यालयातून निघाले. गॅस एजन्सी कार्यालयापासून सुमारे दोनशे मीटर अंतरावर मागून आलेल्या दोन दुचाकीस्वार तरुणांनी सुखदेवे यांना थांबण्याचा इशारा केला. बॅगेत पैसे असल्याने सुखदेव तरुणाकडे दुर्लक्ष करून पुढे जाऊ लागले. त्यानंतर मागे बसलेल्या तरुणाने सुखदेवच्या डोक्यात काठीने वार केले. सुखदेव दुचाकीसह जमिनीवर पडले. त्यानंतर तरुणांनी सुखदेव यांच्याकडील बॅग हिसकावून पळ काढला.
वाडी पोलीस ठाण्यातील पथकाने सीसीटीव्हीच्या माध्यमातून दोन संशयितांवर पाळत ठेवली व त्यांना ताब्यात घेतले. त्यांना विचारणा केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. मो. इमरान इब्राहीम शेख (२९, राठी ले आऊट, आठवा मैल, वाडी) व हर्षल रोशन मेश्राम (२०, नवनीत नगर, वाडी) अशी आरोपींची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायन्नावर, विनोद गोडबोले, राहुल सावंत, गणेश मुंढे, तुलसीदास शुक्ला, प्रमोद गिरी, अजय पाटील, सोमेश्वर वर्धे, दुर्गादास माकडे, राहुल बोटरे, सतिश येसनकर, अश्विन चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
बरेच दिवस केला होता पाठलाग
गॅस एजन्सीची रोकड सुखदेवे हाताळतात याची माहिती आरोपींना होती. त्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली होती व अनेकदा पाठलागदेखील केला होता. त्यांनी सुनियोजित कट रचला व सुखदेवे यांना लुटले. मो. इमरान इब्राहीम शेख याला ऑनलाईन जुगाराचा नाद आहे. त्याने जुगारात पैसे जिंकल्याची बतावणी केली व चोरी केलेली रक्कम स्वत:च्या तसेच नातेवाईकाच्या घरी ठेवली होती. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतूनच चोरी केली होती. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून रोख ८.५५ लाख, मोटारसायकल असा ९.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. न्यायालयाकडून आरोपींची पोलीस कोठडी मिळाली असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे.