लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: देशभरातील १८ राज्यांतील विविध एटीएम सेंटरमधून ८७२ एटीएम कार्ड्सचा वापर करत भामट्यांनी २ कोटी ५३ लाख रुपयांची चोरी केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. याप्रकरणी वनराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तक्रारदार पुनित बलराम हे मे. हिताची सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीत वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक असून कंपनीच्या व्हाइट लेबल एटीएम मशीनचे व्यवस्थापन ते पाहतात. १२ ऑक्टोबर, २०२२ रोजी त्यांच्या कंपनीच्या व्हाइट लेबल एटीएम मशीनचा वीजपुरवठा खंडित करून त्यातून पैसे काढल्याची तक्रार कार्यालयाला मिळाली होती. त्यासाठी डेबिट कार्डचा वापर केला जात असे. रोख रक्कम डिस्पेन्सिंग शटरमध्ये आल्यानंतर भामटे मशीनचा वीजपुरवठा खंडित करायचे आणि डिस्पेन्सिंग शटरमधील पैसे काढून घ्यायचे. त्यामुळे पैसे काढल्याची नोंद मशीनमध्ये होऊ शकत नसे. त्यामुळे हे पैसे ग्राहकाला दिले गेले नसल्याचे रेकॉर्डमध्ये दिसून येई. त्यामुळे ती रक्कम पुन्हा व्यक्तीच्या खात्यात क्रेडिट होत असते. या पद्धतीने हे भामटे एटीएममधून रक्कम चोरी करत होते.
कोणत्या राज्यात चोरी?
एटीएममध्ये छेडछाड करत चोरीची प्रकरणे महाराष्ट्रासह, आसाम, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, उ. प्रदेश, उत्तराखंड, प. बंगाल व हरयाणा या राज्यांमध्ये नोंदली गेली.
गुन्हेगारांचा गाशा लवकरच गुंडाळू
हिताची कंपनीचे प्रशासकीय कार्यालय हे वनराई पोलिस ठाण्याच्या हद्दीत असून त्यांच्या तक्रारीनंतर आम्ही गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा गाशा लवकरच गुंडाळण्यात येईल. - रामप्यारे राजभर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वनराई पोलिस ठाणे