यवतमाळ : मूक बधिर शाळेवर वसतिगृह अधिकारी म्हणून नोकरी लावून देतो असे आमिष दिले. त्यासाठी पैशाची मागणी केली. अडीच लाख रुपये चेक द्वारे स्वीकारले. मात्र नोकरीचा नियुक्ती आदेश मिळालाच नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच युवकाने अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
विवेक भाऊराव चौधरी रा. लक्ष्मीनगर उमरसरा याला दिग्रस येथील विनायक बहुद्देशीय ग्रामीण विकास संस्थेद्वारा संचालित श्री साईछाया मुकबधीर निवासी विद्यालय आर्णी येथे वसतिगृह अधिकारी म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष दिले. घर मालक व भाडेकरू अशी ओळख असल्याने त्याचा फायदा कविता विठ्ठल कन्नलवार रा. आशीर्वादनगर जाम रोड यांनी घेतला.
विवेकचा विश्वास संपादन करीत महिलेने त्याच्याकडून दोन लाख ५० हजार रुपयांचा चेक घेतला. ही रक्कम तिने अमरावती येथील स्टेट बॅंकेच्या खात्यात जमा केली. मात्र विवेकला नोकरी मिळालीच नाही. नोकरीबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जावू लागली. या प्रकरणी विवेकच्या तक्रारीवरून कविता कन्नलवार यांच्याविरुद्ध अवधूतवाडी पोलिसांनी कलम ४२० भादंविनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.