मीरा रोड - सरंक्षित वन्यजीव असणाऱ्या मांडूळ जातीच्या दोन सापांची विक्री करण्यासाठी भाईंदर पूर्वेला फाटक येथे आलेल्या दोघांना नवघर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखने संयुक्त कारवाई करुन अटक केली आहे. या मांडूळ सापांची आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे अडिज कोटी रुपये असल्याची माहिती पोलीस उपअधिक्षक शांताराम वळवी यांनी दिली.नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राम भालसिंग यांना फाटक जवळ मांडूळ जातीच्या दुर्मिळ सापांच्या विक्रीसाठी काही तस्कर येणार असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे पोलीस अधिक्षक डॉ. शिवाजी राठोड, अपर अधिक्षक संजयकुमार पाटील व उपअधिक्षक शांताराम वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने सापळा रचण्याचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची मदत घेण्यात आली.फाटकाजवळ दुपारी साडे तीनच्या सुमारास एक इसम मोठी निळ्या रंगाची बॅग घेऊन आला. त्याच्या जवळ आणखी एक इसम येताच सापळा रचुन असलेले सहाय्यक निरीक्षक प्रमोद बडाख व टिकाराम थाटकर सह उप निरीक्षक विजय टक्के, संजय पाटील, प्रशांत वाघ, संदीप भालेराव, निलेश शिंदे, संदिप शिमदे, प्रदिप टक्के, महेश वेल्हे व महिला पोलीस सुतार यांनी दोघांना ताब्यात घेतले. बॅग उघडली असता आत कुरमुरे होते आणि त्याखाली मांडूळ जातीचे साप लपवून ठेवले होते.
मांडुळ ताब्यात घेत पोलीसांनी वाजीद हुसेन मोहम्मद युसूफ कुरेशी (४७) रा. कासिम नगर, न्यु लिंक रोड, अंधेरी व शंभु अच्छेलाल पासवान (३९) रा. गेट क्र. ८, मालवणी , मालाड या दोघांना अटक केली. वाजीद हा खाटीक असून पासवानला सोबत बॅग सांभाळण्यासाठी हमाल म्हणून आणले होते. वन्यजीव अधिनियम अन्वये दोघां विरोधात गुन्हा दाखल करुन पोलीसांनी मांडूळ हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन अधिकऱ्यांकडे सुपूर्द केले आहेत.आरोपींनी मांडूळ कोणाला विक्रीसाठी आणले होते, तसेच यापूर्वी सुद्धा अशी विक्री केली होती का ? याचा तपास सुरु असल्याचे उपअधिक्षक वळवी म्हणाले. या दोन मांडूळांची किंमत अडिज कोटी रुपये इतकी असुन काळी जादू वा औषध म्हणून याचा वापर केला जात असल्याची माहिती पोलीसांनी दिली.