गौरी टेंबकर-कलगुटकरलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘माझ्या घराजवळून रिक्षा चोरीला गेली. ती चोरासह अवघ्या अडीच तासांत मी शोधून काढली. मात्र, पोलीस ठाण्यातून ती सोडवायला मला सहा महिने गेले.’ दहिसरमध्ये रिक्षाचालक असणाऱ्या नितीन साळुंखे यांची व्यथा आहे. जी त्यांनी ‘’लोकमत’’कडे मांडत याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी केली आहे.
कांदिवलीच्या ठाकूर कॉम्प्लेक्स येथील तेरापंथ भवनात शनिवारी सकाळी उत्तर प्रादेशिक विभागाकडून गुन्हेगारांनी लंपास केलेली मालमत्ता तक्रारदारांना परत करण्याचा कार्यक्रम झाला. त्यात सहा महिन्यांनी रिक्षा परत मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांची रिक्षा घराजवळ पार्क केली होती. तिथून गायब झाल्यावर त्यांनी शोध घेतला. आणि त्यांच्या युनियनच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर रिक्षाचा फोटो तसेच क्रमांक टाकला.
नंतर मित्राच्या मोटरसायकलवरून त्यांनी दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी त्यांना आसपासच्या परिसरात रिक्षा शोधायला सांगितली. त्यावर ते मोटरसायकलवरून गाडीचा शोध घेत होते आणि दहिसरच्या गोकुळधाम हॉटेलजवळ त्यांना स्वतःची गाडी संध्याकाळी आठच्या सुमारास भलताच इसम नेत असून त्याच्या मागे दोन इसम बसल्याचे दिसले. ते प्रवासी असल्याचे मला वाटले आणि म्हणून मी त्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. मीच चोर सापडून दिले असे म्हणाले.
पोलीस म्हणे, तुम्हीच चोराला घेऊन या!साळुंखे यांनी कथित रिक्षाचोर दिनेश गिरी याच्यावर चालत्या रिक्षात झडप घालत त्याला पकडले. ते पाहून मागे बसलेले पसार झाले, तर गिरी साळुंखे यांच्या रिक्षाला स्वतःची रिक्षा असल्याचे सांगत हुज्जत घालू लागला. तेव्हा त्याने रिक्षा चोरल्याचे साळुंखे यांनी ओरडून सर्वांना सांगितले. मात्र, कोणीच मदतीला आले नाही. उलट त्यांनी सेल्फी घेण्यास सुरुवात केली. काही वेळाने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला ज्यावर चोराला पकडलात तर पोलीस ठाण्यातही घेऊन या, असा सल्ला नियंत्रण कक्षाने दिला. मात्र, नंतर दहिसर पोलिसांची गाडी आली त्यात बसून आरोपींना पोलीस ठाण्यात नेले. वाघमारे तपास अधिकाऱ्याने गस्त घालताना जबाबातही चोराला पकडले, असा उल्लेख केला.
पंधरा हजार झाले खर्च...रिक्षाचोर मी पकडला. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून दिले. कोर्टात धावपळीत तसेच रिक्षाच्या दुरुस्तीत जवळपास १५ हजार खर्च झाले. रिक्षा नसल्याने रोजगार बुडाला. सगळं मीच करूनही पोलिसांची एनओसी मिळेपर्यंत सहा महिन्यांचा वेळ गेला आणि अखेर रिक्षा परत मिळाली. - नितीन साळुंखे,रिक्षाचालक, तक्रारदार