पुणे : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे पाहुणे असल्याचे सांगून स्टेट वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनमध्ये सहायकपदी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अडीच लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्याविरोधात सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
उमेशकुमार बबनराव देशमुख (रा. राजमुद्रा सोसायटी, धनकवडी) असे त्याचे नाव आहे. ही घटना मार्च २०१८ ते मे २०१८ दरम्यान घडली होती. याप्रकरणी प्रमोद कर्णे (वय ३७, रा. भेकराईनगर) यांनी फिर्याद दिली आहे. स्टेट वेअरहाऊसिंग कॉपोरेशनच्या सहायक पदासाठी फेब्रुवारी २०१८ मध्ये जाहिरात आली होती. श्रीकांत शेवाळे यांचे मित्र देशमुख यांनी ते सहकार, पणन मत्री सुभाषराव देशमुख यांचे पाहुणे आहेत. सहकार खात्यात नोकरी लावायची असल्यास मी ते काम करुन देईन असे सांगितले. शेवाळे यांनी कर्णेच्या पत्नीला सहायकपदी नोकरी लावता का अशी विचारणा केली. त्यांनी ५ लाख रुपये द्यावे मागितले. प्रथम ५० हजार व नंतर दोनदा एक -एक लाख असे अडीच लाख रुपये दिले. उरलेले पैसे नोकरी लागल्यावर देण्याचे ठरले होते. सहायक पदाची परिक्षा २५ मार्चला झाली. मे मध्ये त्याचा निकाल लागला. त्यात कर्णे यांच्या पत्नीचे नाव नव्हते. त्यांनी उमेश देशमुख यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांना थांबण्यास सांगितले. जूनमध्ये पुन्हा चौकशी करुन पैसे परत करण्याची मागणी केल्यावर तो टाळाटाळ करु लागला. त्यानंतर कर्णे यांनी आॅक्टोबरमध्ये मंत्रालयात जाऊन चौकशी केली. तेव्हा तो देशमुख यांचा पाहुणा नसल्याचे समजले. त्यानंतर कर्णे यांनी शनिवारी सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली.
सहकारमंत्र्यांनी घेतली दखलप्रमोद कर्णे यांनी आॅक्टोबरमध्ये मंत्रालयात जाऊन उमेशकुमार देशमुख हा साहेबांचा नातेवाईक आहे का?, याची चौकशी केली. तेव्हा तो कोणी नातेवाईक नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यावेळी सुभाष देशमुख यांना आपल्या नावावर कोणी फसवणूक करीत असल्याचे लक्षात आले. त्यांनी कर्णे यांना सहकारनगर पोलिसांकडे तक्रार करण्यास सांगितले व त्यांचा अर्ज सहकारनगर पोलिसांकडे पाठवून दिला. देशमुख यांच्या सचिवांनी फोन करुन फसवणूक करणा-यावर कारवाई करण्यास सांगितले. कर्णे हे शनिवारी सकाळी पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांची फिर्याद घेऊन फसवणूकीचा गुन्हा दाखल केल्याचे सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी सांगितले.