नवी मुंबई : ठाणेच्या वर्तकनगर येथे ज्वेलर्स लुटणाऱ्या टोळीच्या दोघांना एपीएमसी आवारातून मंगळवारी अटक करण्यात आली आहे. त्याठिकाणी ते संशयास्पद वावरताना पोलिसांच्या हाती लागले. त्यांच्याकडून गुन्ह्यातील ३ लाख ६७ हजार किंमतीचे सोने जप्त केले आहे.
वर्तकनगर येथील वारीमाता ज्वेलर्स लुटल्याची घटना १७ जानेवारीला घडली होती. ज्वेलर्स च्या बाजूला फळ विक्रीसाठी गाळा भाड्याने घेऊन भिंतीला भगदाड पाडून दुकान लुटण्यात आले होते. या गुन्ह्यात १ कोटी ३७ लाख रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले आहेत. या गुन्ह्याशी संबंधित असलेले आरोपी एपीएमसी आवारात येणार असल्याची माहिती एपीएमसी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त सुरेश मेंगडे, सहायक आयुक्त विनायक वस्त, वरिष्ठ निरीक्षक व्ही. रामुगडे यांनी पथके तयार करून मंगळवारी परिसरात पाळत ठेवली होती. यावेळी मार्केट लगत दोघेजण संशयास्पद फिरताना आढळून आले. यामुळे त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता ते सराईत गुन्हेगार असून वर्तकनगर येथील ज्वेलर्स लुटल्याचे उघड झाले. यानुसार त्यांना अटक करण्यात आली असून राहुल अब्दुल मजीद शेख व साहेब अकबर शेख अशी त्यांची नावे आहेत. दोघेही मूळचे झारखंडचे राहणारे असल्याचे सहायक आयुक्त विनायक वस्त यांनी सांगितले. त्यांच्याकडून गुन्ह्यातील ३ लाख ६७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेल्या मुद्देमालासह या दोघांना ठाणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.