इंदापूर : इंदापूर तालुक्यातील परराज्यातील डाळींब व्यापारी व त्याच्या साथीदाराचे अपहरण करुन त्यांना मारहाण करत त्यांच्याकडुन २० लाखांची खंडणी मागितल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बेपत्ता व्यक्ती एडिसन मैथ्यु यांनी इंदापुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी ७ अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी इंदापूर पोलिसांनी दोघांना अटक केली.सौरभ बाळु तरंगे (वय २०, रा. बळपुडी ता. इंदापूर जि. पुणे.)व राहुल दत्तु गडदे ( वय २८ रा. डोंबावाडी ता. माळशिरस जि. सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गुरुवारी (दि.२४ फेब्रु.) रात्री १० वाजता निमगाव केतकी ते इंदापूर रोडवरील वेताळबाबा मंदिराजवळ माझ्या बोलेरो गाडीला थांबवत अज्ञात ७ लोकांनी मला चाकुचा धाक दाखवुन, दुसऱ्या इनोव्हा गाडीतून मला रात्रभर गाडीत फिरवले. तसेच तु महाराष्ट्रात धंदा करायचा नाही, तु येथुन निघुन जा, तुला आता सुटायचे असेल तर २० लाख रुपये दे , असे म्हणुन मारहाण केली. करुन त्यांनी मला दि. २५ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी १० वाजता २०० रुपये दिले व कोल्हापूर येथे सोडले व ते पुढे निघुन गेले.तपासात आरोपी राहुल दत्तु गडदे सांगितले, यातील अपहरण झालेली व्यक्ती एडिसन मैथ्यू हे डाळींब व्यापारी असून ते चांगल्या दराने शेतकऱ्यांचा माल खरेदी करीत होते. त्यामुळे माझे बऱ्याच डाळींब शेतकऱ्यांशी झालेले व्यवहार मोडले होते. मैथ्यू हे माझे व्यवसायाच्या आड येत असल्याने मी कोल्हापूरच्या माझ्या मित्राकडुन त्यांचे खंडणीसाठी अपहरण करण्यास सांगितले. पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदीप पाटील,अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकार, इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राम गोमारे व त्यांच्या पथकाने तपास करुन ही कारवाई केली.
______________________________________