लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा: आचोळा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी ६५ वर्षीय महिलेच्या गळ्यातून सोन्याची माळ खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपीकडून खेचून नेलेली माळ आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली दुचाकी हस्तगत केली असून पुढील तपास करत आहे.
डॉन लेनच्या भारत कॉलनीत राहणाऱ्या सुनीता गुंडये (६५) या शनिवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पाच वर्षांच्या नातीला घेऊन फेरफटका मारण्यासाठी गाळा नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरून चालत होत्या. त्यावेळी भरधाव वेगातील दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातून ८ ग्रॅम वजनाची सोन्याची माळ खेचून नेली होती. आचोळा पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात केली. महितीदाराकडून गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना माहिती मिळाली की, नालासोपारा पश्चिमेकडील राजोडी परिसरातील एका घरात चोरटे लपून बसले आहे. तात्काळ पोलिसांचे एक पथक त्याठिकाणी जाऊन जयराम पाटील (३३) आणि मनिष बसवत (२४) या दोन आरोपींना ३१ जुलैला ताब्यात घेऊन अटक केली. दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी चोरी केलेली सोन्याची माळ आणि दुचाकी असा एकूण ६५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
"जबरी चोरी करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक करून १ ऑगस्टला वसई न्यायालयात हजर केल्यावर ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे", अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक (आचोळा) चंद्रकांत सरोदे यांनी दिली.