नवी मुंबई : गोवा मार्गावर पुणेचा गुन्हेगार संजय कार्ले (४५) याचा मृतदेह आढळून आला होता. त्याची गोळ्या घालून हत्या केल्यानंतर निर्मनुष्य ठिकाणी ऑडी कार उभी करण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यापैकी एकजण सराईत गुन्हेगार आहे.
मुंबई गोवा मार्गावर पनवेल तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत हि घटना घडली होती. १८ नोव्हेंबर रोजी त्याठिकाणी ऑडी कारमध्ये संजय कार्लेचा मृतदेह आढळून आला होता. छातीत व पोटात पाच गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली होती. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून काही दिवसांपूर्वीच तो पॅरोलवर कारागृहाबाहेर आला होता. मात्र घटनास्थळाचा संपूर्ण परिसर पिंजूनही पोलिसांना गुन्हेगारांचे ठोस पुरावे मिळाले नव्हते. अखेर गुन्हे शाखा कक्ष दोन च्या पथकाने दिड महिन्यांच्या तांत्रिक तपासद्वारे आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
उपायुक्त अमित काळे, सहायक आयुक्त विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक रवींद्र पाटील यांनी वेगवेगळी पथके तयार केली होती. त्यामध्ये सहायक निरीक्षक प्रवीण फडतरे, संदीप गायकवाड, उपनिरीक्षक वैभव रोंगे, मानसिंग पाटील, सुदाम पाटील, हवालदार प्रशांत काटकर, दीपक डोंगरे, रणजित पाटील, सचिन पवार, अनिल पाटील, सागर रसाळ, इंद्रजित कानु, जगदीश तांडेल आदींचा समावेश होता. त्यांनी संशयाच्या आधारे दोघांची माहिती मिळवली होती. त्यापैकी एकजण देहूरोड परिसरात येणार असल्याचे समजताच त्याठिकाणी सापळा रचण्यात आला.
मोहसीन मुलाणी (३७ हा हाती लागला असता झडती मध्ये त्याच्याकडे एक पिस्तूल व तीन काडतुसे आढळून आली. अधिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असता त्याचा साथीदार अंकित कांबळे (२९) यालाही अटक करण्यात आली. दोघेही पनवेलच्या करंजाडे परिसरात राहणारे आहेत. मयत संजय कार्ले हा सराईत गुन्हेगार असून त्याने गुन्हेगारी पार्श्वभूमीच्याच मुलाणी याची देखील फसवणूक केली होती. त्यामुळे मुलाणी याने त्याचा काटा काढल्याचे गुन्हे शाखा उपायुक्त अमित काळे यांनी सांगितले.