ठाणे: वर्तकनगर भागातून मोटारसायकलींची चोरी करणाºया रूपेश रविंद्र पवार (३०, रा. लोकमान्य नगर पाडा, ठाणे) आणि नवनाथ महादेव विरकर (३०, रा. वर्तकनगर ठाणे ) या दोघांना अटक केल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त निलेश सोनवणे यांनी गुरुवारी दिली. त्यांच्याकडून दोन लाख ३९ हजारांच्या सात मोटारसायकली जप्त केल्या आहेत. रुपेश हा निवृत्त पोलिस अधिकाºयाचा मुलगा असल्याचीही माहिती तपासात उघड झाली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वाहन चोरीचा तपास पोलिस उपनिरीक्षक शेटटी यांचे पथक करीत होते. २७ डिसेंबर रोजी एक संशयित व्यक्ती उपवन कडून कॅडबरी नाक्याकडे जात असल्याची माहिती या पथकाला मिळाली. त्याच आधारे शास्त्रीनगर नाका येथे त्याला या पथकाने अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो न थांबता पळून जात असतांना त्याला या पथकाने काही अंतरावर नाटयमयरित्या पकडले.
चौकशीत रुपेश पवार असे त्याचे नाव समोर आले. धक्कादायक म्हणजे तो निवृत्त पोलिस उपनिरीक्षकाचाच मुलगा असल्याचीही माहिती उघड झाली. त्याच्याकडील स्कूटरही त्याने उपवन भागातून चोरल्याची त्याने कबूली दिली. सखोल चौकशीमध्ये पोलिसांनी नवनाथ विरकर या त्याच्या अन्य एका साथीदारालाही सातारा येथून अटक केली. त्यांच्याकडून चोरीतील सात मोटारसायकल आणि मोबाईल असा दोन लाख ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याचे सोनवणे यांनी सांगितले.