मीरारोड - भाईंदरमधील बड्या विकासकाला चिठ्ठी पाठवून रवी पुजारीच्या नावाने ५० लाखांची खंडणी व मुलासह जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने कर्जत जवळील कशेळे गावातून अटक केली आहे.
मीरा भाईंदर मध्ये बांधकाम व्यवसाय सह शाळा, पॅथॉलॉजी लॅब आदी व्यायवसायात असणाऱ्या दिलीप पोरवाल यांच्या डीमार्ट समोरील कार्यालयात एका चिठ्ठीद्वारे ५० लाखांची खंडणी मागण्यात आली होती. खंडणी न दिल्यास त्यांना व त्यांचा मुलगा गौरव ह्या दोघांना ठार मारण्याची धमकी त्यात दिली होती. या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन बिल्डर पोरवाल व मुलास पोलीस बंदोबस्त देण्यात आला.
पोलीस आयुक्त सदानंद दाते व उपायुक्त विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनाखाली ३ पथके नेमली. सहायक आयुक्त अमोल मांडवे , गुन्हे शाखेचे निरीक्षक अविराज कुऱ्हाडे व राहुल राख सह सहायक पोलिस निरीक्षक कैलास टोकले, पुष्पराज सुर्वे, नितीन बेंद्रे व दत्तात्रय सरक, पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे, चंद्रकांत पोशिरकर, राजु तांबे, संदीप शिंदे, किशोर वाडिले, संजय पाटील, अविनाश गर्जे, संजय शिंदे, संतोष लांडगे, पुष्पेंद्र थापा, सचिन सावंत, विजय गायकवाड, मुस्तकीम पठाण, राजवीर संधू, गोवीद केंद्रे, शिवाजी पाटील, राजाराम काळे, प्रशांत विसपुते, विकास राजपुत, समिर यादव, महेश वेल्हे, सुशिल पवार, अनिल नागरे, जयकुमार राठोड यांच्या पथकांनी गुन्ह्याचा तपास सुरु केला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही सह विविध तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तपास करून दोन आरोपींची ओळख निश्चित केली.
गुन्हे शाखेच्या पथकाने इस्टेट एजंट मोहम्मद इक्बाल मोहम्मद अली शेख ( वय ४९ ) रा . सलमा मंजील, चिमटपाडा, मरोळनाका, अंधेरी आणि लॉरेन्स लिओ चेट्टीयार रा. गजानन सोसायटी, साकीनाका, अंधेरी ह्या दोघांना रायगड जिल्ह्यातून अटक केली आहे . धमकीची चिठ्ठी दिल्यावर हे तेथे लपून बसले होते. गुन्हे शाखा दोघांची कसून चौकशी करत असून अटक आरोपींनी रवी पुजारी याचे नाव वापरून धमकावल्याची शक्यता आहे. आरोपींचे कोणाशी लागेबांधे आहेत व या मागचे कारण पोलीस शोधत आहेत, असे सूत्रांनी सांगितले. दोन्ही आरोपीना रविवारी ठाणे न्यायालयात हजर केले असता त्यांना ७ तारखे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.