सोलापूर : बाजारात पाचशे रुपयांच्या बनावट नोटा खरे असल्याचे भासवून वितरित करताना दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी हर्षल शिवाजी लोकरे ( वय २०, रा. कंदर, ता. करमाळा, जि. सोलापूर), सुभाष दिगंबर काळे (वय ३६, रा. भोसरे, ता. माढा, जि. सोलापूर) या दोघांना अटक करण्यात आलेली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दोन्ही इसम हे पाचशे रुपयांच्या बनावट नोटा घेऊन बाजारात वितरित करण्यासाठी जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून त्यांनी सापळा रचून त्यांना पकडले. त्यांच्याकडून पाचशे रुपये किमतीच्या भारतीय चलनाच्या बनावट ४९३ नोटा पोलिसांनी जप्त केले आहेत. आरोपी लोकरे हा काळे याच्या सांगणेवरून या बनावट नोटा बाजारात खपविण्यासाठी जात असताना त्यांना पकडण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. याबाबत आरोपींवर कुर्डुवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला आहे.ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप, यांच्या मार्गदर्शनखाली सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, पोलीस उपनिरीक्षक राजेश गायकवाड, सहा. फौ. श्रीकांत गायकवाड, सहा. फौ. बिराजी पारेकर, सहा. फौ. निलकंठ जाधवर, पोह सर्जेराव बोबडे, हरीदास पांढरे, विजयकुमार भरले, सलीम बागवान, रवि माने, घोरपडे,दिलीप थोरात यांनी केली.