- मयूर तांबडेपनवेल - चिखले गावात घरजावई म्हणून राहणा-या बांगलादेशी ईनामुल मुल्ला याला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली होती. त्याला मदत करणा-या दोघांना तालुका पोलिसांनी १७ जानेवारीला अटक केली. न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली आहे. सारिका पवार व राहू लक्ष्मण पवार अशी दोघांची नावे आहेत. सारिका ईनामुलची पत्नी आहे.नोव्हेंबर २०१९ मध्ये तालुका पोलिसांनी मनोहर राहू पवार या नावाने चिखले गावात राहणा-या ईनामुल मुल्ला याला अटक केली होती. त्याच्याकडे सापडलेल्या बेकायदेशीर व विविध शासकीय कागदपत्रांमुळे तो चर्चेत आला होता. त्याच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर तालुका पोलिसांनी व इंटेलिजन्स ब्युरो यांनी अधिक तपास करत अनेकांची चौकशी केली. त्यानंतर इनामुल यास मदत करणारी त्याची पत्नी सारिका अनंता गायकर (माहेरचे नाव, वय ३५) हिला व बेलवली येथील राहू लक्ष्मण पवार (५०) या दोघांना अटक केली. या दोघांनी इनामुल मुल्ला या बांगलादेशी नागरिकास मदत केली असल्याचा आरोप आहे.बेलवली येथील राहू पवार यांच्याकडे ईनामुल मुल्ला (मनोहर पवार) हा लहानपणापासून काम करत होता. त्यामुळे त्याचे नाव बदलून मनोहर राहू पवार असे ठेवण्यात आले. त्यानंतर त्याचे चिखले येथील सारिका अनंत गायकर या मुलीसोबत २०११ मध्ये लग्न लावण्यात आले होते. त्याला दोन मुले आहेत. दोन महिन्यांपूर्वी तो बांगलादेशला गेला होता. यावेळी आयबीला संशय आला.संशय बळावल्याने केली अटकमराठी नाव असलेला माणूस १५ दिवस बांगलादेश येथे जाऊन एका गावात राहतो व पुन्हा परत येतो. या संशयाच्या आधारे त्यांनी त्याची कागदपत्रे पडताळणी व इतर माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. या संदर्भात नवी मुंबई परिमंडळ २ च्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश जाधव, साहाय्यक निरीक्षक विजय खेडकर, हवालदार मंगेश महाडिक, धीरज पाटील, राकेश मोकल, संतोष चौधरी यांनी चिखलेतून त्याला अटक केली.
बांगलादेशीला मदत करणाऱ्या दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 2:38 AM