मुंबई - दिवाळीदरम्यान सुट्टीत घरे बंद करून बाहेरगावी गेलेल्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर रात्रंदिवस घरफोडीच्या घटना उपनगरात घडल्या होत्या. या घटनांची गंभीर दखल घेत सुट्ट्यांमध्ये बंद घरे हेरून ती फोडणाऱ्या टोळीचा पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कक्ष ९ ने पर्दाफाश केला असून या टोळीतील दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध वांद्रे, माहीम, निर्मलनगर, पायधुनी, वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यांत ३५ हून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती चौकशीतून उघड झाली आहे.
दोन व्यक्ती वांद्रे पश्चिम येथील कुरेशी नगरमध्ये चोरीचे सामान विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ९चे पोलिस कॉन्स्टेबल वारंगे आणि राऊत यांना मिळाली होती. त्यानुसारवरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट नऊच्या पथकाने कुरेशी नगरमध्ये सापळा रचला. एका सिल्व्हर रंगाच्या कारमधून आलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन आरोपी आणि आसिफ खान (वय २३) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या कारची झडती घेतली असता कारमधून सोने-चांदीचे दागिने, अमेरिकन डॉलर्स, टीव्ही, कुलर्स, मोबाइल फोन तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले. हे सर्व साहित्य घरफोडी करून आणल्याचे समोर पोलीस तपासात निष्पन्न झाले.