लातूर : घरफोडीच्या गुन्ह्यातील दाेघा आराेपींच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आवळल्या असून, त्यांच्याकडून दाेन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून चाेरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह दाेन लाखांचा मुद्देमाल लंपास केला हाेता. दरम्यान, याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. या गुन्ह्याच्या तपासासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी पाेलिसांना विशेष सूचना दिल्या. त्यानुसार अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या पथकाने आराेपींचा माग काढला.
गुन्ह्याचा बारकाईने तपास केला असता, खबऱ्याने माहिती दिली. या माहितीच्या आधारे चाेरट्यांचा शाेध घेतला. शंभू विक्रम बुधवाडे (वय २२, रा. मळवटी रोड, लातूर) आणि आकाश ऊर्फ भावड्या बाबूराव कांबळे (वय २४, रा. मळवटी रोड, लातूर) यांना पथकाने राहत्या ठिकाणाहून उचलले. अधिक चाैकशी केली असता, त्यांनी आणखीन एका साथीदारासह हे घर फोडल्याची कबुली दिली. घरफोडीतील मुद्देमालापैकी ४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, असा दाेन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दाेघांनाही अटक केली असून, तिसऱ्या पसार झालेल्या आरोपीचा पोलिस शाेध घेत आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण राठोड, अमलदार रियाज सौदागर, योगेश गायकवाड, राजेश कंचे, प्रदीप स्वामी, प्रदीप चोपणे यांच्या पथकाने केली. अधिक तपास एमआयडीसी ठाण्याचे पोलिस करीत आहेत.