ठाणे : पुण्यातील विश्रांतवाडीतील एका दुकानातून लाखोंच्या घड्याळांची चोरी करून झारखंडमध्ये पलायनाच्या तयारीतील शाहआलम शेख (५३, रा. साहेबगंज, झारखंड) याच्यासह दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने अटक केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी शुक्रवारी दिली. त्यांच्याकडून चार लाख ४८ हजारांची २९० घड्याळेही जप्त केली आहेत.घरफोडीतील काही संशयित कल्याण रेल्वेस्थानकात येणार असल्याची टीप ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्याआधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख, निरीक्षक कृष्णा कोकणी, सहायक पोलीस निरीक्षक नीलेश मोरे, संदीप चव्हाण, उपनिरीक्षक दिपेश किणी, हवालदार राजेंद्र सांबरे, भरत आरवंदेकर, हरीश तावडे, दीपक जाधव, अमोल देसाई, नंदकुमार पाटील आणि शब्बीर फरास आदींच्या पथकाने गुरुवारी कल्याण रेल्वेस्थानकातून परराज्यात जाण्याच्या तयारीतील शाहआलम आणि रुंदल सिंग निरंजन सिंग (३०, रा. झारखंड) या दोघांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीमध्ये त्यांनी १८ जानेवारी रोजी पुण्यातील विश्रांतवाडीतील घड्याळाचे दुकान फोडून चोरी केल्याची कबुली दिली. हाच मुद्देमाल घेऊन ते त्यांच्या झारखंड राज्यातील मूळगावी पळून जाण्याच्या तयारीत असल्याचेही त्यांनी सांगितले.पुण्यात चोरीचा गुन्हाठाणे पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये १९ जानेवारी रोजी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली. या दोघांनीही विश्रांतवाडीतील धानोरीतील भैरवनगर येथे राजेश्वरी वॉच ॲण्ड ऑप्टिशियन या दुकानाच्या खिडकीचे गज रात्रीच्या वेळी कापून चोरी केल्याचे उघड झाले.या दोघांवरही गुन्हे दाखलशाहआलम याच्याविरुद्ध झारखंडमधील राधानगर, नवी मुंबईतील वाशी आणि ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. रुंदल सिंगविरुद्ध झारखंडमध्ये गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुण्यात घड्याळांची चोरी करून पळणारे कल्याणमध्ये जेरबंद; ठाणे गुन्हे शाखेची कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 9:18 AM