मुंबई : रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना धमकीचे सहा ई-मेल पाठवून त्यांच्याकडून ४०० कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. एकाला तेलंगणामधून तर दुसऱ्याला गुजरातमधून जेरबंद करण्यात आले. गणेश वानपारधी आणि राजवीर जगतसिंह खंत अशी या दोघांची नावे आहेत. गणेश वानपारधीला ८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
गेल्या आठवड्याभरात अंबानी यांना धमकी देत पैशांची मागणी करणारे सहा ई-मेल आले होते. या ई-मेलचा माग काढण्यासाठी गावदेवी पोलिसांनी आयपी ॲड्रेसचा शोध घेतला असता हे ई-मेल तेलंगणामधून पाठविण्यात आल्याचे लक्षात आले.
पोलिसांनी पथक पाठवून गणेश वानपारधी या १९ वर्षीय तरुणाला अटक केली. धमकी प्रकरणाचा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतर्फेही समांतर तपास सुरू होता. ई-मेलवरून देण्यात आलेल्या या धमकीचा तांत्रिक तपास करताना गुजरात येथील एका २० वर्षीय तरुणाने ई-मेलवरून धमकी दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने राजवीर जगतसिंह खंत याला गांधीनगर येथून अटक करण्यात आली आहे.
वानपारधीला गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले आहे. शादाब खान या नावाने त्याने ई-मेल केले होते. अंबानी यांच्याकडे सुरुवातीला २० कोटी नंतर २०० कोटी व तिसऱ्या मेलमध्ये ४०० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती.