Salman khan Father threat News : अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांना मॉर्निंग वॉक करताना एका तरुणीने धमकी दिल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी त्यांच्या सुरक्षारक्षकाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी धमकी देणाऱ्या तरुणीसह एक तरुणाला अटक केली. चौकशी वेगळाच प्रकार समोर आला.
मुंबईतील कार्टर रोडवर सलीम खान हे रनिंग केल्यानंतर एका ठिकाणी बसले होते. त्यावेळी एक बुरखा घातलेली तरुणी आणि तरुण गाडीवरून त्यांच्याजवळ आले. तरुणी सलीम खान यांच्याजवळ गेली आणि लॉरेन्स बिष्णोईला बुलाऊ क्या?" असे म्हणाली. बुधवारी (१८ सप्टेंबर) सकाळी हा प्रकार घडला.
सुरक्षारक्षकाने यासंदर्भात वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.
सलीम खान यांना धमकी का दिली?
दरम्यान, पोलिसांनी तरुण आणि तरुणीला अटक केली. अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली. त्यात त्यांनी मस्करी करत होतो असे सांगितले. त्यामुळे दोघांनाही सलीम खान यांच्यासोबत मस्करी करणे चांगलेच महागात पडले.
पोलीस उपायुक्त राज टिळक रौशन यांनी या घटनेबद्दल माहिती दिली. "दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सलीम खान यांना धमकी दिली आणि फरार झाले. दोघांना अटक करण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी मस्करीत असे केले होते. यात दुसरा काही प्रकार नाही", असे ते म्हणाले.
काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली होती. दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी सलमान खानच्या वांद्रे येथील घराच्या दिशेने गोळ्या झाडल्या होत्या.