कल्याण : बनावट कागदपत्रांद्वारे ई-पास बनवून देणाऱ्या सायबर चालकासह त्याच्या एका कामगाराला कल्याण परिमंडळ ३ च्या ई-पास पडताळणी पथकाने ताब्यात घेतले. या दोघांविरोधात खडकपाडा पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला.
प्रतिबंधित क्षेत्रातून दुसरीकडे जाण्यासाठी संबंधित व्यक्तीजवळ ई-पास असणे बंधनकारक आहे. कल्याण परिमंडळ ३ मध्ये पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखालील एक पथक कागदपत्रांची पडताळणी करून ई-पास देते. गावी जाण्यासाठी इच्छुक असणाºया लोकांकडून पैसे उकळून बनावट कागदपत्रांद्वारे त्यांना ई-पास बनवून दिले जात असल्याची माहिती पथकाला मिळाली.
अशाप्रकारचे बनावट पास खडकपाडा परिसरातील ‘सायबर झोन’ या सायबर कॅफेचा चालक प्रमोद भुजबळ (३४, रा. टावरीपाडा) आणि कामगार कुमार पवार (२२, रा. रायते) तयार करून देत असल्याची माहिती ई-पास पडताळणी पथकाच्या निदर्शनास आली.याप्रकरणी ई-पास पडताळणी पथकातील पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य धोडे यांच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलिसांनी दोघांविरोधात विविध कलमांतर्गत गुरुवारी गुन्हा दाखल केला.
एक ते दोन हजार रुपये घेत : कल्याणबाहेर राहणाºया व्यक्ती कल्याणमध्ये राहत असल्याचे बनावट कागदपत्रांद्वारे दाखवले जात होते. चार लोकांच्या एका पासकरिता एक हजार रुपये तर पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती असल्यास एका पाससाठी दोन हजार रुपये आकारले जात होते. अशा प्रकारे अर्ज भरून देताना अर्जदारांकडे कागदपत्र नसले तरी ई-पास बनवून देण्याची हमी देत बनावट कागदपत्र जोडून ई-पास काढून दिला जात होता.