चंद्रपूर : चोर समजून पागलबाबा नगर येथील नागरिकांनी गुरुवारी झाडाला बांधून दोघांना लाठीकाठीने केलेल्या मारहाणीत पंकज लाडगे यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली होती. शनिवारी रात्री पोलिसांनी सुखविंदर सिंग (४२) व परमिंदर सिंग (४४) या दोघांना अटक केली आहे. या दोघांना पोलिसांनी शनिवारी न्यायालयात दाखल केल्यानंतर २३ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील आरोपींची संख्या सहा झाली आहे.पागलबाबा नगर येथे आपल्या मित्राचे घर शोधत असताना पंकज लांडगे व अविनाश किल्लो या दोघांना चोर समजून नागरिकांनी मारहाण केली होती. त्यामध्ये पंकजचा मृत्यू झाला होता. तर अविनाश जखमी झाला होता. अविनाशनने रामनगर पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सहा लोकांचे वर्णन केले होते. त्या आधारावर रामनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक उपनिरिक्षक मिलींद पारडकर यांच्या पथकांनी शुक्रवारी जनरल सिंग कष्टी (३५), सतपालसिंग मट्टू (३७), गुरुदित्ता मट्टू (२२), करणजित सिंग (१८) सर्व राहणार अष्टभुजा वार्ड यांना अटक केली होती. त्यानंतरही पोलिसांकडून इतर दोघांना शोध सुरु होता. शुक्रवारी रात्री सुखविंदर सिंग व परमिंदर सिंग या दोघांना चंद्रपूरवरुन अटक केली होती. त्यांना २३ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास रामनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक उपनिरिक्षक मिलींद पारडकर करीत आहेत.
चोर समजून हत्या प्रकरणात पुन्हा दोघांना अटक, अटक आरोपींची संख्या सहा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 9:26 PM