- सदानंद नाईक उल्हासनगर : गावठी कट्टा विकण्यासाठी आलेल्या तिघा पैकी दोघांना हिललाईन पोलीसांनी अटक केली असून एक जन पळून जाण्याचा यशस्वी झाला. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त केली असून हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील महेश्वरी हॉस्पिटल येथे काही जण गावठी कट्टा विकण्यासाठी येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारिपुत्र याना मिळाली. त्यांच्या आदेशानुसार महेश्वरी हॉस्पिटल परिसरात बुधवारी पोलिसांनी सापळा रचला. संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान दोन इसम रिक्षातून खाली उतरले. त्या संशयित व्यक्तिची झाडाझडती पोलीस पथकाने घेतली असता त्यांच्याकडे एक गावठी कट्टा, जिवंत काडतुसे, जप्त केली. मात्र या घडामोडीत त्यांचा तिसरा साथीदार पळून जाण्याचा यशस्वी झाला. पोलिसांनी अटक केलेल्यांचे नावे धीरज विठ्ठले ,कृष्णा चव्हाण अशी आहे. एक साथीदार इकबाल शेख हा घटनास्थळावरून फरार झाला ,हिललाईन पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमाचे कलम ३ व २५ नुसार या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हिललाईन पोलीस फरार आरोपीचा तपास घेत असून आरोपी गावठी कट्टा कोणाला विकायला आले होते. याबाबत आरोपीची चौकशी सुरू असल्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारीपुत्रे यांनी दिली.