पणजी: बँक अधिकारी असल्याचा बनाव करून फोनवरून महिलेकडून बँक खात्याची माहिती घेऊन १२.७६ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या दोघा सायबर गुन्हेगारांना गोवापोलिसांच्या सायबर गुन्हा विभागाच्या पोलीस पथकाने अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्यांची नावे लखविंदर सिंग आणि दर्शन सिंग अशी असून ते राजस्थानमधील पाकिस्तान सीमेनजीक राहाणारे आहेत. या दोघांनाही पोलिसांनी अटक करून गोव्यात आणले आहे. त्यांच्याकडून बँकेचे पासबूक , सीमकार्ड एटीएमकार्र्डे वगैरे जप्त करण्यात आली आहेत.
तक्रारदार महिला ही उत्तर गोव्यातील असून तिने सायबर पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार या दोघापैकी एकाने तिला फोन करून स्वत: बँक अधिकारी बोलत असल्याचे सांगितले. त्यापूर्वी त्यांनीच फोन करून बँकचे डिटेल्स कुणालाही देऊ नका, तुमची फसवणूक होवू शकते असे सांगून विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला होता.
त्यामुळे हे खरोखरच बँकेचे अधिकारी असल्याचे त्या महिलेला वाटले व तिने बँक खात्याची सर्व माहिती दिली. तसेच नेटबँकींग करताना लागणारी गोपनिय माहितीही सांगून टाकली. नंतर तिच्या बँक खात्यातून १२,७६,६१० रुपये काढले गेल्याचा तिला मेसेज आला व नंतर बँकमध्ये जाऊन तिने खात्रीही करून घेतली. त्यामुळे घाबरलेली ही महिला १८ जून रोजी सायबर पोलीस विभागात गेली आणि या प्रकरणात तक्रार नोंदविली.
सायबर पोलीस विभागाने या प्रकरणात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. त्य महिलेला ज्या क्रमांकावरून फोन आला त्या क्रमांकाच्या आधारावर चालविलेल्या तपासानुसार ते राजस्थानात असल्याचे त्यांना आढळून आले. एक पथक गोव्याहून राजस्थानात दाखल झाले. राजस्थान पोलिसांच्या मदतीने दोघांनाही पकडून त्यांनी गोव्यात आणले.
धाडसी निरीक्षक व उपनिरीक्षक
महामारीच्या या काळात मोठी जोखीम पत्करून दूरवरच्या राज्यात जाणे आणि मोहीम फत्ते करून येणे ही अत्यंत धाडसी कामगिरी सायबर विभागाच्या दोन अधिकाºयांनी केली आहे. या विभागाचे निरीक्षक राजेश जॉब अणि उपनिरीक्षक देवेंद्र पिंगळे हे दोघे अधिकारी या मोहिमेवर निघाले होते. सायबर विभागाचे अधीक्षक शोबित सक्सेना यांनी कौतुक केले आहे. दरम्यान गोव्यात आल्यानंतर या दोन्ही पोलीस अधिकाºयांची तसेच दोन्ही संशयितांचीही कोविड चाचणी करण्यात आली. चौघांचाही अहवाल नेगेटीव्ह आला आहे.