अमरावती : नागपूर-पुणे एक्स्प्रेसमधील एका प्रवाशाला मारहाण करून लुटणाऱ्या दोन आरोपींना रेल्वे पोलिसांनी सोमवारी अटक केली, असून दोघे पसार झाले. मोहम्मद हारूण मोहम्मद अजीज (२१) आणि शेख फिरोज शेख इब्राहिम पठाण (२२, दोन्ही रा. रजानगर) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून जबरी चोरीच्या गुन्ह्यातील तीन हजारांची रोख व दस्तऐवज पोलिसांनी जप्त केले.
दिनेश अरुण दोनाडकर (३०, रा. धर्मशाळा वॉर्ड, ता. घाटंजी, जि. यवतमाळ) हे रविवारी धामणगाव रेल्वे स्थानकावरून पुण्याला जाण्यासाठी नागपूर-पुणे एक्स्प्रेसमध्ये बसले होते. यादरम्यान बडनेरा रेल्वे स्थानकाजवळ आऊटरवर नागपूर-पुणे एक्स्प्रेस सिग्नल न मिळाल्याने थांबली. त्यावेळी दिनेश हे जनरल डब्याजवळील तिसऱ्या कोचमध्ये एकटेच होते. सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास चार आरोपी रेल्वे डब्यात शिरले आणि त्यांनी दिनेश यांना मारहाण करून, त्याच्याजवळील आठ हजारांची रोख व दस्तऐवज हिसकावून पळ काढला. या घटनेची तक्रार दिनेश दोनाडकर यांनी बडनेरा रेल्वे पोलीस ठाण्यात नोंदविली. त्यानुसार अज्ञात आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ३९४, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला.
घटनेच्या अनुषंगाने पोलिसांकडे आरोपीबद्दल कुठलीच माहिती उपलब्ध नव्हती. पोलीस उपनिरीक्षक बंडू मेश्राम, पोलीस हवालदार राहुल हिरोडे, प्रवीण वऱ्हेकर विजू देवेकर, मनीष पाटील, भुपेश दोगडी, रामटेके यांनी आऊटरजवळील परिसरात चौकशी आरंभली. त्यावेळी आरोपींची नावे निष्पन्न झाली. या माहितीवरून पोलिसांनी दोघांना अटक केली, तर दोघे पसार झाले. दोन्ही आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना ९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस अन्य आरोपींचा शोध घेत आहेत.