पुणे : पाटे संस्कृती मैदानात संशयास्पदरित्या थांबलेल्या दोघा तरुणाकडे केलेल्या चौकशीत त्यांनी लॉकडाऊनच्या काळात तब्बल अडीच लाख रुपयांचे २४ मोबाईल चोरल्याचे उघडकीस आले आहे.अमर वैजनाथ समुखराव (वय२०, रा़ आंबेगाव पठार, मुळ पांढरगाव, ता़ गंगाखेड, जि. परभणी) आणि प्रविण ऊर्फ अनिल नामदेव विटकर (वय २३, रा़ जांभुळवाडी रोड, कात्रज) अशी त्यांची नावे आहेत. दत्तवाडी पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस शिपाई सागर सुतकर यांना माहिती मिळाली होती़ त्यानुसार पाटे संस्कृती मैदानाजवळ एका दुचाकीवर बसलेल्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील दुचाकीची कागदपत्रे नव्हती. त्यांच्याकडील मोबाईल कोठून आणला याची चौकशी केल्यावर तो पर्वतीयेथील तावरे कॉलनी येथून चोरला असल्याचे त्यांनी सांगितले. दोघांना ताब्यात घेऊन केलेल्या अधिक तपासात त्यांनी गेल्या ३ महिन्यात तब्बल २४ मोबाईल चोरल्याचे उघडकीस आले असून पोलिसांनी ते जप्त केले आहेत. पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.