जळगाव : नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील एका कंपनीच्या मालवाहतूक डंपरमधून लाखो रुपये किमतीचे साहित्य चोरून परप्रांतात पसार होणाऱ्या चारपैकी दोन चोरट्यांना रविवारी सायंकाळी जळगाव लोहमार्ग पोलिसांनी सचखंड एक्स्प्रेसमधून ताब्यात घेतले. अन्य दोघे चोरटे पसार झाले आहेत. या पकडलेल्या चोरट्यांना रात्री उशिरा नांदेड येथून आलेल्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
नांदेड तालुक्यातील हदगाव तालुक्यातील दिग्रस येथील एका कंपनीतर्फे मालाच्या वाहतुकीसाठी चार डंपर भाडेतत्त्वावर लावण्यात आले आहेत. या डंपरवर चालक म्हणून काम करणारे आरोपी मोहम्मद हसन, मोहम्मद रमजान,गुलाब नबी व कलाम मोहम्मद यांनी ४ डंपरवरील १ लाख २० हजार रुपये किमतीचे दोन सेन्सर चोरून नेले. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर, त्यांनी तत्काळ हदगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी लागलीच तपास चक्रे फिरवून, पसार होणाऱ्या या आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी चोरीचे साहित्य घेऊन परप्रातांत पळून जाणारे आरोपी हे सचखंडने प्रवास करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.
जळगाव स्टेशनवर घेतले दोघांना घेतले ताब्यातनांदेड पोलिसांनी चौकशी केल्यानंतर चारही चोरटे नांदेड-अमृतसर एक्स्प्रेसनने परप्रांतात जात असल्याचे जळगाव लोहमार्ग पोलिसांना कळविले. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी जळगाव रेल्वे स्टेशनवर सापळा रचून मनमाडकडून येणाऱ्या बोगीमधून दोन जणांना अटक केली. तर उर्वरित दोन जण जळगाव स्टेशनवर गाडी थांबण्यापूर्वीच पसार झाले होते. उर्वरित दोघा आरोपींचा शोध सुरू असल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले. ही कारवाई रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक चयनसिंग पाटील, लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटील, सहाय्यक फौजदार रामराव इंगळे, सचिन भावसार, नरेंद्र चौधरी, किशोर पाटील यांनी केली.