चिखलदरा (अमरावती) : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या क्राईम सेल व सिपना वन्यजीव विभागाच्या अधिका-यांनी वाघ व वन्यप्राण्यांच्या अवयवासह चार दिवसांपूर्वी अटक केलेल्या सात आरोपींकडून मिळालेल्या माहितीवरून धारणी तालुक्यातील एका गावातून दोघांना शुक्रवारी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पाच वाघनखे, साडेतीन सेंटिमीटर वाघाची कातडी व भाला जप्त करण्यात आला. दोन वर्षांपूर्वी कोहा जंगलात वाघाची शिकार केल्याची कबुली आरोपींनी दिली. आतापर्यंत तारुबांदा वाघ शिकार प्रकरणात एकूण नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक तथा अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी, सिपना वन्यजीव विभाग (परतवाडा) चे उपवनसंरक्षक अविनाश कुमार, गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक कमलेश पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी सम्राट मेश्राम, ढाकणाचे आरएफओ हिरालाल चौधरी, तारुबांदाचे आरएफओ सुहास मोरे, वाय.बी. मारोडकर, कोलकास वर्तुळाच्या वनरक्षक प्रियंका कुलट, हरीश देशमुख, बाळासाहेब घुगे, पवन नाटकर, गणेश मुरकुटे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
चौकशीला वेग, एमपी कनेक्शनतारूबांदा परिक्षेत्रातील कोहा जंगलात दोन वर्षांपूर्वी वाघाची शिकार करण्यात आल्याची कबुली अटकेतील आरोपींनी दिली. त्यामुळे त्या वाघाच्या सर्व अवयवांचा शोध घेत असताना शुक्रवारी धारणी तालुक्यातील एका गावातून अटक केलेल्या आरोपींजवळ केवळ साडेतीन सेंटिमीटरची वाघाची कातडी व पाच वाघनखे मिळाली. कातडी अगदी कमी आकाराची असल्याने ती सॅम्पल म्हणून दाखविण्यात आली की कशासाठी, याबाबत चौकशी सुरू आहे. पूर्वीच या शिकाºयांचे मध्यप्रदेश कनेक्शन उघड झाल्याने आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.