यवतमाळ : उमरखेड-हदगाव रस्त्यावर एका ढाब्याजवळ थांबलेल्या दुचाकीवरील दोघांकडे गावठी पिस्टल आढळून आले असून या प्रकरणी उमरखेड पोलिस ठाण्यात दोघाजणावर कलम ३, २५ शस्त्र अधिनियम १९५९ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डिटेक्शन ब्रॅंच प्रमुख पोलिस उपनिरीक्षक अनिल सावळे हे पेट्रोलिंग करीत असताना उमरखेड -हदगाव रस्त्यावर दोघेजण गावठी बनावटीचे पिस्टल बाळगून असल्याची माहिती मिळाली. यावरून पथक सदर रस्त्याकडे जाताच एका ढाब्याजवळ दोघेजण एमएच-२६-सीबी-२१७० या क्रमांकाच्या दुचाकीवर बसून असल्याचे आढळले.
पोलिसांना पाहताच त्यांनी दुचाकीवरून पसार होण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाठलाग करून पोलिसांनी पकडले. या दोघांची अंगझडती घेतली असता फिरोज खान अन्सार खान (३२) रा. जुने बसस्टॅन्ड हदगाव जि. नांदेड याच्या कंबरेला पिस्टल आढळून आले. त्याच्यासोबत असलेला मुस्ताक खान उर्फ राजा खमरखा पठाण (२२) जुने बसस्टॅन्ड हदगाव या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील दुचाकीसह पिस्टल असा एकूण ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक सागर इंगळे, संदीप ठाकूर, मोहन चाटे, अंकुश दरबस्तेवार, विनोद पांडे, विशाल जाधव, विवेक धोंगडे, नवनाथ कल्याणकर आदींच्या पथकाने केली.