धुळे : दुचाकीवर गोणीसह बॉक्स घेऊन गुंगीकारक औषधांचा साठा विक्री करण्यापूर्वीच दोघांना शिताफिने पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश मिळाले. ही कारवाई महापालिकेच्या शेजारील गल्लीत शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास करण्यात आली. दोन संशयित तरुणांमध्ये एक सुरत येथील आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे.
मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडवून आणणाऱ्या गुंगीकारक औषधांच्या बाटल्यांची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने महापालिकाजवळील शिवाजी हायस्कूलच्या परिसरात एमएच ३९ आरडी ११३९ क्रमांकाच्या दुचाकीवरुन फिरत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास पथक दाखल झाले.
सर्वत्र शोध घेतला असता महापालिकेच्या शेजारील बोळीत दुचाकीवर एका गोणी आणि दोन बॉक्ससह दोन जण आढळून आले. चौकशी केली असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे देताच त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या तपासणीतून आणि चौकशीतून काही बाबींचा उलगडा झाला. पोलिसांनी गुंगीकारक औषधांच्या बाटल्यांचा साठा आणि दुचाकी असा ९४ हजार ३२० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
याप्रकरणी तौसिफ शाह सलिम शाह (वय २४, रा. रमजान बाबा नगर, उस्मानिया मशिदजवळ, ८० फुटीरोड, धुळे) अतुल कन्हैय्यालाल राणे (वय २३, रा. गांधी नगर, सपना पान सेंटर, सुरत, गुजरात) यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी कमलेश सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला.
पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत, कर्मचारी रफिक पठाण, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, संदिप सरग, योगेश चव्हाण, कमलेश सूर्यवंशी, राहूल गिरी, गुलाब पाटील यांनी ही कारवाई केली.