मंगेश कराळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा: दुचाकी चोरणाऱ्या दुकलीला विरारच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांनी अटक केली आहे. या दोन्ही आरोपीकडून ४ गुन्ह्यांची उकल केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी सोमवारी दिली आहे.
विरारच्या विद्या मंदिर स्कूल अपना नगर चाळीत राहणारे भंगार विक्रेते पवनकुमार जटाशंकर शर्मा (२५) यांची ५० हजार रुपये किमतीची दुचाकी १६ ऑक्टोबरला पहाटे पाचच्या सुमारास डोंगरपाडा, व्हिग्स हॉटेल समोर पार्क करून ठेवली असताना चोरट्यानी तेथून ती चोरी करून नेली होती. या चोरी प्रकरणी विरार पोलिसांनी वाहन चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्हयाचे अनुषंगाने विरार गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ गुन्हयाचे घटनास्थळावरील सीसीटीव्ही व मिळालेल्या माहीतीच्या आधारे आरोपी अनिकेत जोशी (२३) आणि तैबान कुरेशी (२४) या दोघांनाही अटक केले. आरोपीकडे चौकशी केल्यावर सदर गुन्हातील तसेच विरार पोलीस ठाण्यातील इतर ३ गुन्ह्यातील ३ अशा एकुण ४ गुन्हयातील ४ दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अभिजित मडके व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलीस हवालदार सचिन लोखंडे, संदिप जाधव, विशाल लोहार, इंद्रनिल पाटील, संदिप शेरमाळे, योगेश नागरे, संदिप शेळके, मोहसिन दिवाण, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, रोशन पुरकर, प्रफुल सोनार यांनी केली आहे.