नितीन गव्हाळे
अकोला: रिधोराजवळील पुंगळी निर्मिती कारखान्यासह आपातापा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील झालेल्या दोन गुन्हे स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी उघडकीस आणुन दोन चोरट्यांना गुरूवारी अटक केली. त्यांच्याकडून चोरीतील ३ लाख ५२ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. रिधोरा येथील पुंगळी निर्मिती कारखान्यातून १९ ऑगस्ट २०२३ रोजी पुंगळ्या बनविण्याचे साहित्य चोरी नेल्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी सुरज राजु आठवले(२५) रा. महात्मा फुले नगर, खदान व उमेश रमेश भालेराव(२८) रा. कैलास टेकडी खदान यांना ताब्यात घेऊन विचारपुस केली असता, त्यांची चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून पुंगळी बनविण्याचे स्टीलचे वेगवेगळे साच्याचे पाच डाय एकुण किंमत १ लाख ७५ हजार रूपये, स्टिलचे पुंगळ्या बनविण्याचे बॉबीन १११ नग एकुण किंमत १ लाख ६६ हजार ५०० रूपये असा मुद्देमाल जप्त केला.
तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र आपातापा येथे ७ ऑगस्ट रोजी ईलेक्ट्रीक बॅटरी व इन्व्हर्टर चोरीप्रकरणात बलदेव रामराव वानखडे(४५) रा. आपोती ता. जि. अकोला यास ताब्यात घेतले. त्याने दोन साथीदारांसह आपातापा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून ईलेक्ट्रीक बॅटरी किंमत १५ हजार रूपये जप्त करण्यात आली. आरोपींना पुढील तपासासाठी बाळापूर व बोरगाव मंजू पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. ही कारवाईस्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक शंकरराव शेळके, पीएसआय गोपाल जाधव, एएसआय दशरथ बोरकर, गोकुळ चव्हाण, फिरोज खान, उमेश पराये, सुलतान पठाण, भास्कर धोत्रे, खुशाल नेमाडे, लिलाधर खंडारे आदींनी केली.