धुळे : मालेगाव रोडवर गुजर कम्पाऊंडच्या बोळीत रिक्षामध्ये अवैध गॅस भरताना दोघांना पोलिसांनी रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास उपअधीक्षक एस. ऋषिकेश रेड्डी व त्यांच्या पथकाने केली. त्यांच्याकडून रिक्षासह विविध साहित्य असा एकूण ९३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आझादनगर पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
मालेगाव रोडवर गुजर कंपाऊंडच्या बोळीत राहणारा मोहम्मद सादीक शहाबुद्दीन शहा (वय २०) हा घरगुती वापरायचे एचपी कंपनीचे गॅस सिलेंडरमधील गॅस अवैधरित्या रिक्षाचालक फैजल शेख फिरोज (वय २३, रा. दोन हजार वस्ती, पूर्व हुडको) याच्या एमएच ०२ डीके ८९८८ क्रमांकाच्या रिक्षेमध्ये गॅस भरताना रंगेहात मिळून आला. पोलिसांनी विद्युत मोटार, १० सिलेंडर, इलेक्ट्रीक वजनकाटा, ऑटोरिक्षा आणि रोख ८०० रुपये असा ९३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघांना अटक करण्यात आली असून आझादनगर पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
ही कारवाई पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक एस. ऋषिकेश रेड्डी व त्यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय उजे, कर्मचारी कबीरोद्दीन शेख, रमेश उघडे, प्रशांत पाटील, चंद्रकांत जोशी, मंगा शेमले, कर्नल चौरे, चंद्रकांत पाटील यांनी कारवाई केली.