जळगाव - पाचोरा येथील किसन उर्फ विठ्ठल राठोड या मालवाहू वाहनाच्या चालकाच्या खून प्रकरणात प्रवीण उर्फ भंगाऱ्या भिमराव पाटील व रवींद्र आधार सोनवणे (दोघे रा.पाचोरा) या दोघांना न्यायालयाने जन्मठेप व सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तदर्थ सत्र न्यायाधीश आर.एन.हिवसे यांनी मंगळवारी हा निकाल दिला.
या घटनेबाबत माहिती अशी की, किसन राठोड हा २४ फेब्रुवारी २०१७ रोजी रात्री १० वाजता वाहनातून पाण्याच्या बाटल्यांची खेप घेऊन पाचोरा शहरात आला असता जळगाव चाफुलीवर थांबला. तेथे अंडाभूर्जीच्या गाडीजवळ लघवी करण्यासाठी गेला. तेथून परत गाडीकडे येत असताना त्याचा प्रवीण पाटील याला धक्का लागला. त्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. तेथे असलेला प्रवीणचा मित्र रवींद्र आधार सोनवणे याने देखील किसन याला मारहाण केली. यावेळी रवींद्र याने किसन याला घट्ट पकडून ठेवले तर प्रवीण याने त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. पळून जात असताना प्रवीण याने किसन याच्या पाठीवरही वार केले. रक्तबंबाळ अवस्थेत पाहून प्रवीण व रवींद्र दोघंही तेथून दुचाकीने पळून गेले. दरम्यान, किसन याची वाट पाहत असलेला त्याचा चुलत भाऊ विशाल अमरसिंग राठोड याने किसन याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
९ जणांची साक्ष महत्वपूर्णपाचोरा पोलीस स्टेशनचे निरीक्षक नवलनाथ तांबे यांनी या गुन्ह्याचा तपास करुन संशयिताविरुध्दचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. खटल्याच्या दरम्यान, सरकारपक्षाने नऊ साक्षीदार तपासले.त्यात फिर्यादी विशाल अमरसिंग राठोड, राणासिंग श्रावण पवार, पंच राजेंद्र माधवराव शिंपी, युवराज ताराचंद नाईक, कुणाल सुखदेव कोळी, मुकुंदा साहेबराव पाटील, डॉ.मंदार मुकूंद करमबेळरकर व तपासाधिकारी नवलनाथ तांबे यांच्या साक्ष महत्वपूर्ण ठरल्या. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी बाजू मांडली. न्यायालयासमोर आलेले पुरावे व साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरुन न्या. आर.एन.हिवसे यांनी प्रवीण उर्फ भंगाऱ्या भिमराव पाटील व रवींद्र आधार सोनवणे (दोघे रा.पाचोरा) या दोघांना न्यायालयाने जन्मठेप व सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी प्रमोद कुलकर्णी व शालीग्राम पाटील यांनी या खटल्यात सहकार्य केले.