औरंगाबाद: त्रिमूर्ती चौकातील पद्मावती ज्वेलर्स फोडण्याचा कट रचणाऱ्या सांगलीच्या अट्टल गुन्हेगारासह दोन जणांना पुंडलिकनगर पोलिसांनीअटक केली. आरोपींनी गारखेड्यात एका महिलेच्या स्कुटरच्या डिकीतील ८५ हजार रुपयांची पर्स चोरण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्याकडून चोरीची मोटारसायकल आणि अर्धाकिलो चांदीच्या वस्तू हस्तगत करण्यात आल्या.
रोहित बाबासाहेब भेंडे(२१,रा. एरंडोली खांडी, ता. मिरज, जि. सांगली) आणि गौतम चंद्रकांत थोरात(२०,रा.पाथरवाला, ता. नेवासा, जि. अहमदनगर)अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, पुंडलिकनगर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि डी.बी.पथकाचे कर्मचारी गुरूवारी रात्री गस्तीवर असताना विजयनगरकडे जाणाऱ्या विना नंबरच्या दुचाकीस्वारांना संशयावरून पाठलाग करून पकडले. ठाण्यात नेऊन त्यांची चौकशी केली असता सुरुवातील उडवाउडवीची उत्तरे ते देवू लागले. नंतर खाक्या दाखविताच त्यांच्याजवळील मोटारसायकल ही त्यांनी सांगली जिल्ह्यातील वाळवा येथून चोरून आणल्याची कबुली दिली. शिवाय त्रिमूर्ती चौकातील पद्मावती ज्वेलर्स हे दुकान ते रात्री फोडणार होते, अशी कबुली त्यांनी दिली. या दुकानाची रेकीही केल्याचे पोलिसांना सांगितले.
यादरम्यान रात्री ११ वाजता पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पूनम सतिश सारडा यांनी आरोपींना पाहून यांनीच त्यांच्या गारखेडा येथील घरासमोर उभ्या दुचाकीची डिक्की उघडून त्यातील २५ हजार रुपये रोकड , सोन्याचांदीचे दागिने , मोबाईल असा सुमारे ८५ हजाराचा ऐवज असलेली पर्स पळविण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. आरडाओरड केल्याने आरोपी विना नंबरच्या मोटारसायकलवर पळून गेल्याचे सारडा यांनी पोलिसांना सांगितले. सारडा यांनी आरोपींची दुचाकीही ओळखली. सारडा यांची आरोपींविरोधात तक्रार नोंदवून घेण्यात आली. ही कारवाई सपोनि सोनवणे, उपनिरीक्षक विकास खटके, प्रभाकर सोनवणे,कर्मचारी रमेश सांगळे,मच्ंिछद्र शेळके, बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड,प्रवीण मुळे, दीपक जाधव, विलास डोईफोडे, रवी जाधव,नितेश जाधव, एसपीओ विटेकर यांनी केली.
सांगलीतील सोन्याचांदीचे दुकान फोडल्याची कबुलीआरोपी दहा दिवसापूर्वी दिघंची (ता.आटपाडी,जि.सांगली) येथील अदित्य ज्वेलर्स हे दुकान अन्य साथीदारांच्या मदतीने फोडल्याची कबुली दिली. या गुन्ह्यातील त्याचे साथीदाराकडे सोन्याचांदीचे दागिने साथीदाराने गावाजवळील शेतात लपवून ठेवल्याचे सांगितले. याचोरीतील काही वस्तू आरोपींनी मोटारसायकलचया सीटखाली ठेवल्याचे सांगितल्याने पोलिसांनी अर्धा किलोचे चांदीचे देव,देवतांना वाहण्यासाठी चांदीच्या वस्तू आणि चोरीची मोटारसायकल जप्त केली. शिवाय ते सांगली, कोल्हापूर ,कोपरखैरने,नवी मुंबई आदी ठिकाणी त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत.