ठाणे- ठाण्यातील वागळे इस्टेट आणि उल्हासनगर भागात दहशत माजवून खंडणी उकळणाऱ्या आशिष उर्फ सोनू पांडे (३२, रा. नवी मुंबई) आणि जग्गु सरदार उर्फ जगदीश तिरिथसंग लभाना उर्फ पंजाबी (३८, रा. उल्हासनगर) या दोघांवर एमपीडीए अंतर्गत ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंह यांनी कारवाई केली. या दोघांनाही अनुक्रमे येरवडा (पुणे ) आणि नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्द करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी गुरुवारी दिली.
कळवा परिसरात राहणारा कुप्रसिध्द गुन्हेगार आशिष याच्याविरुद्ध खंडणी उकळणे, जबरी चोरी, ठार मारण्याची धमकी देणे आणि विनयभंगासारखे गंभीर स्वरूपाचे सहा गुन्हे कळवा आणि नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात दाखल आहेत. तर उल्हासनगर भागात राहणारा कुप्रसिध्द गुन्हेगार जग्गु सरदार उर्फ जगदीश याच्याविरुद्धही खंडणीसह शस्त्र बाळगणे, असे पाच गुन्हे उल्हासनगर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्यांच्या हिंसक तसेच घातकी कृत्यांना आळा बसण्यासाठी त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्रिवेंशन ऑफ डेंजरस अॅक्टीव्हिटी अॅक्ट (एमपीडीए) कायद्याखाली स्थानबद्दतेच्या कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त सिंह यांनी दिले. त्यानुसार २३ डिसेंबर रोजी आशिष याला येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे तर जग्गू सरदार याला २२ डिसेंबर रोजी नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द केले आहे.
वर्षभरात नऊ जणांवर एमपीडीएची कारवाई- गेल्या वर्षभरात ठाणे पोलिसांनी एमपीडीए कायद्यांतर्गत नऊ जणांना स्थानबद्ध केले आहे. यापुढेही गुन्हेगारांच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी, अशी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.