यवतमाळ : हायप्रोफाईल व्यक्तींना गंडविण्यासाठी फेसबुक अकाउंट चालविणाऱ्या संदेश अनिल मानकर याला यवतमाळ पोलिसांनी ४ सप्टेंबर रोजी अटक केली. त्याने दिल्लीतील आंंतरराष्ट्रीय दर्जाच्या शल्यचिकित्सक डॉक्टरला दोन कोटींचा गंडा घातला होता. संदेश महिनाभरापूर्वी जामिनावर कारागृहातून बाहेर आला. गुरुवारी सायंकाळी त्याचा मृतदेह दारव्हा मार्गावरील फ्लॅटमध्ये आढळून आला.
संदेश अनिल मानकर (२१) असे या ठगाचे नाव आहे. संदेशने दिल्लीतील डॉक्टरला आपल्या मैत्रीच्या जाळ्यात ओढून अनन्यासिंग ओबेरॉय या महिलेच्या नावाने गंडविले होते. त्याने फेसबुक अकाउंटसाठी एका कोरियन मॉडलचा देखणा फोटो वापरला होता. संदेशचा भंडाफोड झाल्यानंतर त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली होती. तो महिनाभरापूर्वी जामिनावर बाहेर आला. दारव्हा रोड स्थित जसराणा अपार्टमेंटमध्ये तो राहत होता. त्याने गेल्या काही दिवसांपासून आत्महत्या कशी करायची याचे नियोजन केल्याचे घटनास्थळावरून दिसून येते. संदेशने आत्महत्या करण्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर मागवून घेतला. तो फ्लॅटच्या मागील दारात ठेवला होता. त्याची मोठी आई वर्धा येथे कामानिमित्त गेली असता त्याने पाईपद्वारे थेट नायट्रोजन नाकाला लावला. यामुळेच त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज लोहारा पोलिसांनी वर्तविला आहे.संदेशने आत्महत्या करण्यापूर्वी चार पानांची सुसाईड नोट तयार केली आहे. त्याने संपूर्ण नोट ही इंग्लिशमध्ये लिहिली आहे. पोलीस ती वाचून आत्महत्येच्या कारणांचा शोध घेत आहेत. प्रथमदर्शनी प्रकरण आत्महत्येचे वाटत असले तरी शवचिकित्सा अहवालानंतरच मृत्यूचे कारण निश्चित होणार आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. त्याची मोठी आई घटनेची माहिती देण्यासाठी लोहारा पोलीस ठाण्यात पोहोचली होती. या प्रकरणी लोहारा ठाणेदार अनिल गुघल यांनी घटनास्थळी भेट दिली. अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून, याचा तपास सुरू आहे.
व्यापाऱ्यांनाही फसविले होते
देखण्या ललनेचा फोटो वापरत फेसबुक अकाउंट चालविणाऱ्या संदेशने अनेक हायप्रोफाईल व्यक्तींना गंडा घातला. दिल्लीच्या डॉक्टरपूर्वी त्याला दोन मोठ्या व्यावसायिकांनी पैसे दिले होते. त्यामुळेच काही न करता संदेश लाखो रुपये किमतीचा मोबाईल वापरत होता. त्याने फेसबुक अकाउंटद्वारेच अनन्यासिंग ओबेरॉय या महिलेच्या नावे आभासी विश्व तयार केले होते. त्याला अनेक जण भुरळले होते. मात्र पोलिसांच्या तपासात संदेशने फारसी माहिती दिली नव्हती.