मुंबई : भाडेतत्त्वावर दाेन कॅमेरे घेऊन ते लंपास करणाऱ्या दोघांना आरे पोलिसांनी बुधवारी अटक केली. दोघेही नवोदित गायक असून यूट्युबवरील त्यांच्या गाण्याच्या व्हिडीओमुळे ते पोलिसांच्या तावडीत सापडले.संदीप वर्मा आणि सादिक अन्सारी अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. कुणाल कांजिया (१९) नामक व्यक्तीकडून ३० नोव्हेंबर रोजी या दोघांनी दोन डिजिटल कॅमेरे घेतले होते. ज्याचे दरदिवशी एक हजार रुपये भाडे देऊ, असे त्यांनी कांजिया यांना सांगितले. मात्र नंतर कॅमेरे घेऊन ते पसार झाले. दोघांनी कॅमेरा मालकाला खोटा पत्ता आणि मोबाइल क्रमांक दिला होता, त्यामुळे त्यांना शोधणे कठीण झाले होते. अखेर कांजिया यांनी आरे पोलिसांत तक्रार केली. पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी आणि आरे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उल्हास खोलम आणि त्यांच्या पथकाने आरेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेतली. यात दोघांचा चेहरा कैद झाला हाेता. ज्या मोटरसायकलवरून ते पळून गेले त्याचा क्रमांकही सापडला. पाेलिसांनी शेकडो यूट्युब व्हिडीओही पाहिले. त्यावेळी ‘तू वापस आजा’ या गाण्यात त्यांना दोन्ही आरोपी सापडले. त्यानुसार मालवणीमध्ये राहणाऱ्या दोघांना अटक करण्यात आल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.
नवोदित गायकांनी चाेरले दोन डिजिटल कॅमेरे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 9:34 AM